ऑनलाईन शिक्षणाचा केवळ फार्स; शिक्षणाच्या नावाखाली पालकांच्या मोबाईलवर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:12 AM2020-06-29T02:12:54+5:302020-06-29T02:13:16+5:30
विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी, कोरोनाच्या संकटकाळातही यंदाचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु केल्याचा टेंभा शिक्षण खात्याने मिरवला.
सुरेश लोखंडे
ठाणे : शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील शिक्षणाच्या ‘ज्ञानाचा दिवा’ घरोघरी तेवत असल्याचे अजूनही दिसत नाही. शाळेचा पहिला दिवस ऑनलाइनच्या वर्गापासून करण्याचा संकल्प केवळ फार्स ठरला आहे. दुर्दैवाने, ना शाळा सुरु झाल्या, ना ऑनलाइन धडे मिळत असल्याचे वास्तव शिक्षण विभागालाही ज्ञात नाही. यामुळे जिल्ह्यातील दोन हजार ९४७ प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील नऊ लाख सहा हजार ३५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही यंदाचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु केल्याचा टेंभा शिक्षण खात्याने मिरवला; पण दोन आठवडे उलटले असतानाही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. आॅनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी महागडे टॅब विद्यार्थ्यांच्या माथी मारले आहेत. शासनाच्या दिक्षा अॅपसह झूम अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याच्या मानसिकतेत असलेल्या शाळा त्यासाठीदेखील मोठे शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. यावरूनही शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये शाब्दीक चकमकी सुरु आहेत.
ठाणे जिल्ह्यातील एक हजार ६१६ माध्यमिक शाळांपैकी फक्त ६२६ शाळांना पूर्णवेळ, अर्धवेळ आणि दिवसाआड वर्ग भरवता येणे शक्य होते. मात्र या नियोजनानुसार शाळा सक्रिय झाल्याचा अहवाल अजूनही प्राप्त नसल्याच्या वृत्तास माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दुजोरा दिला आहे. शहापूर, मुरबाड तालुक्यात चार ते पाच शाळा पूर्णवेळ भरण्यास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित ९९0 माध्यमिक शाळा कोरोनाच्या भीतीदाखल बंदच असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एक हजार ६00 माध्यमिक शाळांमधील सव्वा आठ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला आहे. जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३१ प्राथमिक शाळांमधील ८१ हजार ३५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य तूर्तास तरी रामभरोसेच आहे.
तांत्रिक अडचणी आणि महाजाल
ऑनलाइन लेक्चर, शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोबाईलवर ताबा मिळवला आहे. टिकटॉक, गेम्स, व्हिडिओज, व्हॉट्सअॅप आदींमध्येच विद्यार्थ्यांचा वेळ सध्या वाया जात आहे. मोजक्या शाळा ऑनलाइन धडे देत असल्या तरी इंटरनेट कनेक्टिव्हीटी व्यवस्थित नसल्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. मोबाईल हाताळताना काही विद्यार्थ्यांकडून चुकीने अॅप्लिकेशनच डिलीट होत आहेत. काही जाणीवपूर्वक नको ते अॅप डाऊनलोड करून इंटरनेटच्या महाजालात अडकत असल्याच्या समस्या दिसून येत आहेत.