सेनेतील निष्ठावंत वाऱ्यावरच
By admin | Published: May 18, 2016 03:01 AM2016-05-18T03:01:37+5:302016-05-18T03:01:37+5:30
शिवसेनेनेदेखील अखेरच्या क्षणी रवींद्र फाटक यांना संधी देऊन पक्षातील जुन्याजाणत्या निष्ठावंताना कात्रजचा घाट दाखविला
ठाणे : ठाणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेनेदेखील अखेरच्या क्षणी रवींद्र फाटक यांना संधी देऊन पक्षातील जुन्याजाणत्या निष्ठावंताना कात्रजचा घाट दाखविला आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी या जागेसाठी इच्छुक असलेल्यांच्या अनेक निष्ठावानांच्या चेहऱ्यावर नाराजीचे स्पष्ट भाव दिसून आले. परंतु, फाटक यांना उमेदवारी देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघ पुन्हा एकदा सेफ केल्याची चर्चा मात्र निष्ठावान शिवसैनिकांमध्ये चांगलीच रंगली होती. अशा प्रकारे जर वारंवार उपऱ्यांनाच संधी मिळत असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांनी जायचे कुठे ? असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसंत डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेनेतून अनेक इच्छुक समोर आले होते. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन शेवटच्या क्षणापर्यंत खलबते सुरु होती. परंतु, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच शिवसेनेने शेवटच्या क्षणी निष्ठावंतांना डावलून रवींद्र फाटक यांना पुन्हा एकदा आमदारकीचे द्वार खुले केले आहे. त्यांच्या उमेदवारीबाजी निवडणुकीतील घोडेबाजारात टिकणारा तगडा उमेदवार हा निकष मातोश्रीने लावल्याचे सांगितले जात तरी, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ शिंदे साहेबांनी सेफ केल्याची चर्चा मात्र निष्ठावंतांमध्ये सुरु होती. फाटक यांना भाजपाकडून आॅफर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. ते जर भाजपात गेले कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातून ते विधानसभेचे उमेदवार असतील अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळेच फाटकांना विधान परिषदेची संधी दिल्याचे बोलले जात आहे.
फाटक यांनी १९ जुलै २०१४ रोजी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला तोच मुळी आमदारकी मिळावी म्हणून. त्यानुसार ठाणे शहर मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी विधानसभेला हालचाली केल्या होत्या. यावेळीदेखील सुमारे ९ निष्ठावान शिवसैनिक या उमेदवारीसाठी दावा ठोकून होते. त्यामध्ये अनंत तरे आणि गोपाळ लांडगे यांचा प्रामुख्याने समावेश होता. परंतु, त्यांची नाराजी लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने फाटकांचे नाव निश्चित करुन त्यांना संधी दिली. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक कमालीचा नाराज झाला होता. तरे यांनी तर थेट कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करुन थेट शिंदे यांना तेंव्हा आव्हान दिले होते. परंतु, छाननीत तरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता.
२०१३ मध्ये कोपरीमधील पोटनिवडणुकीनंतर शिंदे समर्थकांनी कोपरीसह संपूर्ण शहरभर पोस्टर लावून, फाटकांचे विधानसभेचे द्वार बंद असा उल्लेख त्यावर केला होता. मात्र, तरीदेखील त्यांनाच विधानसभेचे तिकीट दिले. त्यामुळे या निवडणुकीत निष्ठावतांची नाराजी शिवसेनेला भोवल्याने येथे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांनी फाटकांचा तब्बल १२ हजार ८५५ मतांनी पराभव केला होता. विधान परिषदेसाठी अनंत तरे, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु, बंडखोरी, मतांचे विभाजन, इच्छुकांची नाराजी अन घोडेबाजारातील मतांच्या खरेदीची गणिते लक्षात घेऊन शिवसेनेने ऐनवेळेस फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.
फाटकांच्या नावामुळे, पुन्हा एकदा शिवसेनेत वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असून, एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा संधी कशासाठी असा सवाल निष्ठावान शिवसैनिक करु लागला आहे. वारंवार अशा पद्धतीने निष्ठावानांना डावलले जात असेल तर त्यांनी जायचे कुठे अशा विंवचनेत ही आता हा शिवसैनिक सापडला आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यावेळेस निष्ठावान शिवसैनिक हजर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील स्पष्ट नाराजी दिसून आली. यामध्ये इच्छुकांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आता विधान परिषदेची गणिते बिघडतात की शिवसेना ते सोडविते हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
फाटक पुन्हा खुले!
२०१३ मध्ये कोपरीमधील पोटनिवडणुकीनंतर शिंदे समर्थकांनी कोपरीसह संपूर्ण शहरभर पोस्टर लावून, फाटकांचे विधानसभेचे द्वार बंद असा उल्लेख त्यावर केला होता. तरीही त्यांनाच विधानसभेचे तिकीट दिले. त्यामुळे निष्ठावतांची नाराजी शिवसेनेला भोवली. या खेळीचा अनुभव गाठीशी असतांनाही शिवसेनेने पुन्हा फाटकांना विधान परिषदेची संधी दिली आहे.
विधान परिषदेसाठी अनंत तरे, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी यांच्या नावांची सुरूवातीपासून जोरदार चर्चा सुरु होती. परंतु, त्यांना संधी मिळाली नाही.