अवघ्या पाच दिवसाचा स्वराज पॅनकार्डधारक!
By admin | Published: March 1, 2017 12:24 AM2017-03-01T00:24:21+5:302017-03-01T00:24:21+5:30
महाराष्ट्रातील लहान पॅनधारक : कोल्हापुरातील अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
गणेश शिंदे -- कोेल्हापूर कोल्हापुरातील शुक्रवार पेठ, पिवळा वाडाजवळील अमोलदादा शिशुपाल पाटील (रा. १८२१ डी, वॉर्ड) यांनी त्यांच्या अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचे पॅनकार्ड काढले आहे. हे पॅनकार्ड त्यांना आयकर विभागाकडून प्राप्त झाले आहे. स्वराज अमोलदादा पाटील असे या नवजात बालकाचे नाव आहे. यापूर्वी बिहार येथील एका बालिकेचे पॅनकार्ड पाचव्या दिवशी काढले होते. त्यानंतर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कमीत कमी वयाचे हे पॅनकार्ड ठरले आहे.
अमोलदादा पाटील हे कर सल्लागार आहेत. ९ जानेवारी २०१७ रोजी पाटील यांच्या पत्नीने रायबाग (जि. बेळगाव) येथील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याच्या जन्मानंतर चौथ्या दिवशी खानापूर तहसीलदार कार्यालयातून स्वराज अमोलदादा पाटील नावाचा दाखला काढला व पाचव्या दिवशी स्वराजचा जन्मदाखला, त्याचे दोन आयकार्ड फोटो, आपले आधारकार्ड व पॅनकार्ड अशी कागदपत्रे प्राप्तिकर विभागात दिली. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वराजचे पॅनकार्ड त्यांच्या घरी पोस्टाने आले. आयकर भरण्यासाठी, एलआयसी, पासपोर्ट व ओळखीचा पुराव्यासाठी पॅनकार्डचा उपयोग होतो.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केल्यानंतर बॅँक अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयात पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या पॅनकार्डमुळे सरकारला देशातील कोणत्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, हे समजू शकणार आहे. त्यामुळे आधारकार्डबरोबर पॅनकार्डही सरकारने सक्तीचे केले आहे.
याबाबत अमोलदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मानंतर मुलाचे पॅनकार्ड तत्काळ काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार देशभरात किती बालकांची पॅनकार्ड काढली आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळी बिहारमधील एका बालिकेचे पाचव्या दिवशी पॅनकार्ड काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मला मुलगा झाल्यावर पाचव्या दिवशी त्याचे पॅनकार्ड काढले. असे महाराष्ट्रातील हे पहिलेच पॅनकार्ड ठरले.
पॅनकार्ड काढल्यामुळे मुलाच्या नावे आतापासून नियोजनपूर्वक गुंतवणूक करता येते व त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला व पाल्याला होतो. तसेच करबचतही करता येते.
- अमोलदादा पाटील, कोल्हापूर.