चौकशीचा नुसताच फार्स
By admin | Published: August 4, 2014 03:31 AM2014-08-04T03:31:11+5:302014-08-04T03:31:11+5:30
गणेशोत्सवानिमित्त आॅगस्ट अखेरीस कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झाले
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आॅगस्ट अखेरीस कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झाले आणि एकच धक्का बसला. यात काही घोटाळा झाल्याची ओरड झाल्यावर चौकशी करण्यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांकडून रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (वाहतूक) अमिताभ लाल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र चौकशी प्रमुख असलेले अमिताभ लाल जुलै महिन्यातच निवृत्त झाले असून, ही चौकशी थांबली असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. फक्त कोकणवासीयांसाठी हा चौकशीचा फार्स दाखवण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवास सुरुवात होत असून, कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्या नियमित ट्रेनचे आरक्षण जून महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आले. मात्र आरक्षण सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला ट्रेन फुल्ल झाल्या आणि वेटिंग लिस्टचा सामना गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना करावा लागला. कोकणकन्या ट्रेन तर अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने प्रवाशांनी मोठा गोंधळच केला. त्यामुळे यामागे तिकीट दलाल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची साखळीच असल्याचा अंदाज लावला गेला. मात्र रेल्वे प्रशासनाने हा अंदाज धुडकावून लावत कुठलाही घोटाळा नसल्याचे स्पष्ट केले. तर भाजपाच्या नेत्यांनी थेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि चौकशीसाठी रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (वाहतूक) अमिताभ लाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा होईल, अशी आशा कोकणवासीयांना होती. मात्र आॅगस्ट महिना उजाडला तरी चौकशी समितीतून अजूनही काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच एका महिन्यात या समितीकडून माहिती दिली जाणार असतानाही तशी माहितीही समोर आलेली नाही. या चौकशी समितीचे एकमेव प्रमुख असलेले अमिताभ लाल हे जुलै महिन्यातच निवृत्त झाल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे
या प्रकरणाची चौकशी थांबलेली आहे. (प्रतिनिधी)