केवळ धावते घोडे की चांगला माणूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 04:31 AM2018-05-27T04:31:00+5:302018-05-27T04:34:05+5:30

नेमक्या कोणत्या करिअरची निवड करायची हा सध्या घराघरांत चर्चिला जाणारा विषय आहे. करिअरकडे बघताना केवळ पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहावे, की अन्यही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात... अशाच वेगळ्या पैलूंना स्पर्श करणारा विशेष लेख खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी....

Only good horses that are good! | केवळ धावते घोडे की चांगला माणूस!

केवळ धावते घोडे की चांगला माणूस!

googlenewsNext

- श्याम मानव

अर्थार्जनाचे क्षेत्र निवडताना पहिला निकष आवडीचा लावावा. एखादे काम आवडते. मनापासून आवडते, त्या कामात आपल्याला उत्तम गती प्राप्त करता येण्याची शक्यता नेहमीच अधिक असते. त्यातील आवश्यक ते सारे कौशल्यज्ञान प्राप्त करण्यासाठी कदाचित प्रचंड परिश्रम करावे लागणार असले तरी ते करण्यासाठी आपण तयार असू शकतो.

कारण त्या प्रचंड परिश्रमातूनही आपल्याला आनंदच मिळतो. त्यामुळे तुमच्या आवडीच्या कामात उत्तम कौशल्य प्राप्त करणं, त्या क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटवणं सहजसाध्य बनतं. सोबत जगण्यासाठी आवश्यक तेवढं अर्थार्र्जन प्राप्त झालं, तरी सुलभतेनं जगता येतं, आयुष्याचं सार्थक होऊ शकतं. करिअर निवडताना आवडणारं क्षेत्र निवडणं खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणेन सर्वाधिक महत्त्वाचं आहे.

करिअर कोणतं निवडायचं? हा अनेकांच्या मनातला प्रश्न काहींसाठी सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. दहावी-बारावीच्या निकालांची वाट पाहणे सध्या सुरू आहे. पुढील जीवनाची दिशा ठरवायची आहे. पालक आणि विद्यार्थी दोहोंपुढे ही समस्या बनली असेल. त्याचे योग्य उत्तर शोधण्याचा, वेगवेगळ्या माध्यमांमधून करिअरसंबंधी सल्ला प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू असेल.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, त्याआधी काही महत्त्वाचे, पण मूलभूत प्रश्न उपस्थित करू इच्छितो. विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही.
एक : करिअर कशासाठी निवडायचं? त्याचा उद्देश काय?
दोन : करिअर घडवायचं म्हणजे नेमकं काय घडवायचं? त्याचे मापदंड काय?
तीन : जीवनात यशस्वी व्हायचं, यश प्राप्त करायचं म्हणजे काय? काय प्राप्त करायचं?
गेली तीस वर्षे मी व्यक्तिमत्त्व विकास या क्षेत्रात काम करतो आहे. पालक विद्यार्थी आणि आजचे एकूणच स्पर्धात्मक जग करिअरकडे कसं पाहतं हे जवळून पाहतो, अनुभवतो आहे.
कळत-नकळत या प्रश्नासंबंधी विचार करताना, आपल्या मुलांना यशस्वी बनविण्याच्या प्रयत्नात या स्पर्धात्मक युगात रेसचे घोडे बनविण्याच्या एका चक्रव्यूहात आपण त्यांना अडकवत तर नाही ना? या प्रश्नाचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत गरज आहे. रेसचे घोडे हे केवळ ‘विजेते’ आणि ‘पराजीत’ या दोन प्रकारांत विभागले जातात.
विजेते घोडे अधिक विजेते बनण्यासाठी वा विजेतेपण टिकविण्यासाठी ऊर फुटेस्तोवर धावत राहतात. आयुष्याच्या अंतापर्यंत धावतच राहतात. कदाचित आजच्या आधुनिक जागतिकीकरणाच्या युगात अशांनाच ‘यशस्वी’ म्हणतात. पण यांची संख्या मोजकीच असू शकते. आणि पराजित ‘घोडे’ही धावतच राहतात, विजयी बनण्यासाठी वा पराजयापासून पळण्यासाठी ते धावतात.
कदाचित ऊर फुटेस्तोवर धावताना काही काळ ‘विजेते’ हे यशस्वी प्रकारात प्रवेश करतात, पण तेही पुन्हा पराजित होण्याच्या भीतीपासून सतत पळत राहतात. आणि ज्यांना ‘विजेता’ प्रकारात प्रवेशच करता येत नाही. ते स्वत:वर अपयशाचा, पराजिताचा शिक्का मारून आयुष्यभर मान मोडून (खाली घालून) धापा टाकत राहतात, हे बहुसंख्य असतात. हे दृश्य गेली ३० वर्षे मी खूप जवळून पाहतो आहे, अनुभवतो आहे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी प्रकर्षाने मांडत आलो आहे.
एक : सगळ्यात पहिले आपण स्वत:ला आपल्या मुलांना उघडपणे, प्रभावीपणे सांगितले पाहिजे, ‘आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत. आयुष्यात चांगला माणूस बनून जगलो पाहिजे. चांगला माणूस म्हणून जगणे हा आपल्या आयुष्याचा खरा उद्देश आहे.’
हा उद्देश कठीण वाटला तरी सगळ्यांना साध्य होण्यासारखा आहे. प्रयत्न केल्यास, प्रत्येकाच्या आवाक्यातला आहे. प्रत्येकाचे आयुष्य ‘सफल’ बनवण्याच्या शक्यतेतले आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या ‘माणूस’ नावाच्या व्यक्तीसोबत संपूर्ण जगाचंच भलं करण्याच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा टप्पा आहे.
दोन : चांगला माणूस बनताना, जगताना एकटं असो वा कुटुंब करून जगणं असो, काहीतरी अर्थार्जन करणं आवश्यक आहे. किमान खाऊन-पिऊन नीट जगता येईल एवढं तरी अर्थार्जन करणं नितांत गरजेचं आहे. हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागतं.
अर्थार्जनाच्या क्षेत्रात कदाचित आयुष्यभर काम करावं लागेल. जे
काम आयुष्यभर करावं लागणार आहे
ते मला मनापासून आवडणारं असलं
तर? संपूर्ण आयुष्यच आवडीचं
बनून जाईल! काम काम वाटणार नाही. तो सहज जगण्याचा भाग बनून जाईल! मनापासून केलेल्या कामातून नेहमीच आनंद मिळतो. सारं जीवनच आनंदी बनून जाईल.
एखादी व्यक्ती प्राध्यापक-शिक्षक झाली. पण त्या व्यक्तीला शिकवणंच आवडत नसेल तर? पुढे धड शिकवणंही जमत नाही. आयुष्यभर पगारासाठी तो पाट्याच टाकत राहतो. ना त्याला विद्यार्थ्यांकडून आदर मिळतो, ना समाधानानं जगता येतं. सारं आयुष्यच अपुरं राहतं. ज्या शिक्षकांना शिकवणं मनापासून आवडतं त्या शिक्षकांना नेहमीच विद्यार्थ्यांचा आदर प्राप्त होतो. जगणं सार्थकी लागतं. आयुष्य भरभरून जगल्याचं समाधान मिळतं.
डॉक्टर बनायचं असेल, तर केवळ हुशारी कामाची नाही. तुम्हाला
रोग्यांची सेवा करणं मनापासून
आवडलं पाहिजे. ज्या डॉक्टरांना रोग्यांविषयी कणव आहे, मनात सेवाभाव आहे, जे डॉक्टर उत्तम आरोग्य सेवा देतात, त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं. पैशाच्या मागे न लागतासुद्धा छान जगता येईल, एवढा पैसा त्यांच्या मागे धावत येतो. आणि जे डॉक्टर हुशार आहेत, पैसा आहे म्हणून डॉक्टर झाले आहेत आणि पैसा कमावणं हा एकमात्र उद्देश ठेवून डॉक्टरी व्यवसाय करतात, ते कळत-नकळत कसाई बनतात. त्यांना कधीच समाधान-आनंद प्राप्त होत नाही. त्यांच्या मनातली अपराधीपणाची टोचणी, कधीना कधी डोकं वर काढते. मग ते दारूच्या पार्ट्यांमध्ये समाधान-सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. जगाला दिसणारा ‘यशस्वी’ हॉस्पिटलचे मजले चढवणारा डॉक्टर, आतून मात्र प्रचंड पोखरलेला आणि असुरक्षित असतो, रिता असतो.
प्राध्यापक आणि डॉक्टरी व्यवसाय मी फार जवळून पाहिले आहेत. दोन्ही व्यवसाय प्रचंड समाधान देणारे, आयुष्य सार्थकी लावणारे असल्यामुळे मुद्दाम मी ती उदाहरणं दिली आहेत.
केवळ भरपूर पैसा मिळविण्याचा उद्देश ठेवून अर्थार्जनाचं क्षेत्र कदापि निवडू नका! त्यातून काहीही साध्य होत नाही. फक्त पैसाच हाती लागू शकतो. पैसा भरपूर उपभोगाची साधनं उपलब्ध करून देऊ शकतो. पण समाधानाने आनंदी जीवन सार्थकी लागण्याची तृप्ती देऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे आजच्या समाजात ज्याला खूप प्रतिष्ठा आहे, किंमत आहे, जे यशाचं शिखर समजलं जातं, पण मनापासून मात्र आवडत नाही, असंही
क्षेत्र निवडू नका. उदाहरणार्थ आयएएस परीक्षा पास करणं. पण खरंच
आपल्याला सरकारी नोकरी करावीशी वाटते का? त्याद्वारे देशाचं, समाजाचं भलं करण्याची ऊर्मी आपल्यात आहे का? त्यासाठी आवश्यक तो संघर्ष करण्याची तयारी आहे का? की त्या सरकारी अजस्त्र यंत्रणेचा एक निर्जीव पुर्जा बनून राहणं आणि भरपूर पैसा ओरबाडणं एवढंच आपल्याला करायचं आहे? हे आता ठरवावं लागेल.
‘माझ्या आवडीचं क्षेत्र फारसा पैसा देणारं नसेल. समाजात प्रतिष्ठा, सन्मान, तथाकथित यश देणारं नसेल तर? मग कसं निवडता येईल ते क्षेत्र? असलं करिअर निवडून नुकसानच होणार ना? हा महत्त्वाचा प्रश्न आहे? पण याचंही अचूक उत्तर शोधता येतं, ते पुढच्या लेखात शोधू या.
(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि संघटक असून व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातील कार्यशाळा घेण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.)

Web Title: Only good horses that are good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.