शौचालय असेल तरच धान्य मिळणार
By admin | Published: October 2, 2016 10:32 PM2016-10-02T22:32:04+5:302016-10-02T22:32:04+5:30
ज्या ग्रामस्थांकडे शौचालय नाही त्यांना यापुढे स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप करू नये असे आदेश अकोल्याच्या जिल्हाधिका-यांनी
Next
>राजू वैराळे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 2- ज्या ग्रामस्थांकडे शौचालय नाही त्यांना यापुढे स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप करू नये असे आदेश अकोल्याच्या जिल्हाधिका-यांनी बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला दिले आहेत. जिल्हाधिका-यांनी दिलेला लेखी आदेश ग्रामसेवक गजानन लांडे यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बोरगाव वैराळे येथे आयोजित ग्रामसभेत वाचून दाखविले. यामुळे शौचालय नसणा-या ग्रामस्थाचे धाबे दणाणले.
ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी शासन खेड्यातील लोकांना प्रोत्साहनपर साडेबारा हजार रुपये अनुदान देत असले तरीही अनेक ग्रामस्थ शौचालय घरात बांधण्यासाठी उदासीन असून, उघड्यावर शौचाला जातात. उघड्यावर शौचाला जाणे बंद व्हावे, यासाठी अकोला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अभिनव संकल्पना हाती घेतली असून, यापुढे उघड्यावर शौचाला जाणा-या लोकांना धान्य वाटप स्वस्त धान्य दुकानातून करू नये, असे आदेश बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला दिले.
या आदेशाची प्रत येथील ग्रामसेवक गजानन लांडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार विकास कोकाटे यांना दिली असून, त्यांनी गावात दवंडी पिटवून उद्यापासून शौचालय नसणाºया लोकांना तसेच शौचालय असल्यानंतरही त्याचा वापर न करणाºया लोकांना धान्य वाटप करू नये असे जाहीर केल्याने गावात खळबळ उडाली असली तरी, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अभिनव संकल्पनेचे विनायकराव वैराळे यांनी स्वागत केले.