फक्त लाट असेल तरच मिळतात भरभरून मते !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:19 AM2019-03-29T01:19:51+5:302019-03-29T01:20:08+5:30
गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली.
-प्रेमदास राठोड
गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण ७४६ जण लोकसभेवर गेले. त्यापैकी फक्त ३९५ खासदारांना खरा कौल म्हणजे ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली. उर्वरित ३५१ खासदारांना ५० टक्क्यांहून कमी मतांवर समाधान मानावे लागले. १९७७ पासून एकूण ११ सार्वत्रिक निवडणुकांमधील प्राप्त मतांवर नजर फिरवली असता लाट असेल तरच विजयी उमेदवाराला भरभरून मते मिळतात. नाहीतर अनेक खासदारांना ५० टक्के मतेही मिळत नाहीत.
१९७७ पासूनच्या ११ निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ५२८ पैकी २६० जणांना ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली तर २६८ खासदारांना त्यापेक्षा कमी मते पडली. १९७७ च्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची लाट (१० पैकी ८ जागा काँग्रेस) तर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसविरोधी लाट होती. त्यावेळी ४८ पैकी तब्बल ४२ खासदारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे १८, भालोदचे १७, माकप व शेकापचे प्रत्येकी ३ आणि खोरिपच्या एकाचा समावेश होता. फक्त नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जळगाव व कोल्हापूर या ६ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्क््याहून कमी मते पडली होती.
१९८० च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट होती. त्यावेळी ४८ पैकी ४० खासदारांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यातील तब्बल ३४ खासदार एकट्या काँग्रेसचे होते. ठाणे, खेड, कुलाबा, बारामती, जळगाव आणि मुंबईतील ३ अशा फक्त ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून कमी मते मिळाली होती. इंदिरा गांधी हत्येनंतरच्या निवडणुकीत १९८४ मध्येही काँग्रेसची लाट होती. त्या वेळी ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली होती. यात काँग्रेसचे ३० आणि समाजवादी काँग्रेसच्या दोघांचा समावेश होता.
१९७७ ते १९८४ लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये लाट अनुभवलेल्या महाराष्ट्रात नंतरच्या तीन निवडणुकांत कोणतीही लाट नव्हती. १९८९ मध्ये फक्त २१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली होती. १९९१ मध्ये ही संख्या २० पर्यंत खाली आली. १९९६ मध्ये तर अवघ्या ८ ठिकाणी विजयी उमेदवाराला ५० टक्क्याहून जास्त मते पडली. रत्नागिरी, मुंबई उत्तर, बारामती, जालना, जळगाव, ठाणे, सांगली व पुणे वगळता इतर ४० ठिकाणच्या विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून कमी मते पडली होती. त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीमुळे १९९८ मध्ये मध्यावधी झाल्या, त्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट बघावयास मिळाली. त्या वेळी ३१ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते पडली, त्यात एकट्या काँग्रेसचे २५ जण होते. पुन्हा तीन निवडणुकांमध्ये (१९९९, २००४ व २००९) कोणतीही लाट नव्हती. त्यामुळे या निवडणुकांत १५ पेक्षा जास्त लोकांना ५० टक्क्यांचा कौल मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट होती. त्या वेळी पुन्हा एकदा ३२ जणांना ५० टक्क्याहून जास्त मते मिळाली.