‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

By admin | Published: April 23, 2016 04:05 AM2016-04-23T04:05:14+5:302016-04-23T04:05:14+5:30

उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही

Only the living water reservoir in 'Teyar'! | ‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

Next

सुमेध वाघमारे ,  तेर (उस्मानाबाद)
उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही. गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे या धरणात आजघडीला केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चारही गावांची तहान सध्या टँकरवरच भागत आहे.
जवळपास २२ हजार लोकसंख्येच्या तेरमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा, रोजगार हे प्रश्नही गंभीर बनले आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २०३ विहिरी आणि २८२ बोअरवेल असले तरी यातील ८० टक्के स्रोत आटले आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने ३ टँकर व
४ अधिग्रहीत बोअरवरून पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुराच ठरत आहे. शिवाय गावात ग्रामपंचायतीच्या १२पैकी ७ स्रोत सुरू असून, मध्यंतरी लोकसहभागातून बोअर घेतल्यामुळे काही भागांतील रहिवाशांना दिलासा मिळाला. परंतु, गोदावरी भाग, पेठ, बसस्टँड परिसर, पूर्व भीमनगर, मातंग वस्ती, विठ्ठलनगर, अंजनानगर या भागाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
तेरमध्ये १६९६ नोंदणीकृत मजूर असून, त्यांनाही मजुरीसाठी भटकंती करावी लागत आहे. येथे विहीर पुनर्भरणाच्या कामावर केवळ ७ मजूर उपस्थित असून, इतर मजूर मिळेल त्या कामावर समाधान मानत आहेत. चारा छावणीमुळे
मिळाला दिलासा
तेर येथे एकूण १६१८ पशुधन आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गहन होत असतानाच येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे पशुपालकांची ही चिंता काही प्रमाणात दूर झाली.
तेरमध्येही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, ही तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सरपंच सुवर्णा माळी यांनी सांगितले.
तेरमध्ये मजुरांची संख्याही मोठी आहे. परंतु, रोजगाराअभावी कुणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मागेल त्याच्या हाताला काम देण्याचे प्रयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले.
> ‘दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ’
विटा (जि. सांगली) : राज्यातील ९८ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून, सर्व योजना पूर्ण करण्यासाठी अजून ९० हजार कोटींची आवश्यकता आहे. कर्जरोखे, कर्ज काढून हा निधी उपलब्ध करणार असून, भाजपाचे सरकार सत्तेच्या उर्वरित कालावधीत राज्यातील ८० टक्के जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
पाण्याची ८० ते ९० टक्के गळती होत आहे. ती रोखण्यासाठी यापुढील काळात पाइपबंद पाणी योजनांना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपलब्ध पाण्यात सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
आम्हाला २०१७ची अंतिम मुदत देण्यात आली असून, टेंभू योजनेवरील सर्व सिंचन क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. उपसा सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार असले तरी ठिबकच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असे सांगून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ, असेही महाजन म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Only the living water reservoir in 'Teyar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.