फक्त मोदीच! दणदणीत विजयानंतर सामनामधून मोदींवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 09:12 AM2019-05-24T09:12:17+5:302019-05-24T09:14:03+5:30
शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेल्यानंतर सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करण्यात येत होती.
मुंबई - शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेल्यानंतर सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करण्यात येत होती. मात्र गुरुवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सामनामधून मोदींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. लोकांनी ठरवले व मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केले. हे मोदी यांच्या लोकप्रियतेचे व अमित शहा यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे यश आहे, असे कौतुकोदगार सामनामधून काढण्यात आले आहे.
मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. ‘‘मोदी हरत आहेत,’’ असे राहुल गांधी शेवटच्या दिवसापर्यंत सांगत होते. मात्र स्वतः राहुल गांधी अमेठीत पराभूत झाले आहेत. मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी विद्वेषी प्रचार केला. पण मतदारांनी तो मान्य केला नाही. मोदींच्या तुलनेत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे काँग्रेससह सगळ्याच राजकीय विरोधकांची शोचनीय अवस्था होऊन गेली आहे. एकमेकांच्या तंगड्यांत तंगडी अडकवून विरोधक एकजुटीचे प्रदर्शन करीत होते, पण झाले काय? असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.
विरोधकांनी बेरोजगारीपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न प्रचारात उभे केले. हे सर्व सोडविण्यासाठी पुन्हा मोदीच योग्य हे शेवटी जनतेने मान्य केले. काँग्रेसने साठ वर्षे देश रगडला, मग मोदींना आणखी पाच वर्षे का देऊ नये? लोकांनी मोदी यांच्यावर जबरदस्त विश्वास दाखवला. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन! अशा शब्दात सामनामधून मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. जाहीर झालेल्या 542 जागांच्या निकालांपैकी 352 जागांवर भाजपा आणि मित्रपक्षांनी विजय मिळवला. पैकी 300 हून अधिक जागा भाजपाने जिंकल्या. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाच्या युतीने मोठे यश मिळवले. महाराष्ट्रामध्ये भाजपाने 23 आणि शिवसेनेने 18 अशा मिळून 48 पैकी 41 जागा जिंकल्या.