अरे देवा...! बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकांत एकच हस्ताक्षर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:07 AM2023-05-20T11:07:21+5:302023-05-20T11:07:48+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आता तोंडावर बोट ठेवले आहे.
छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बोर्डात खळबळ उडाली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आता तोंडावर बोट ठेवले आहे.
बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही केंद्रांमधील या उत्तरपत्रिका आहेत. आठ दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण अद्यापही मुळापर्यंत पोहोचता आलेले नाही. बोर्डात यासंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर आहे, तर मग सेंटरच मॅनेज झाले होते, की उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या. उत्तरपत्रिकांना नेमके कोठून पाय फुटले, हा साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. यासंदर्भात दोन- तीन दिवसांत मॉडरेटर्सची चौकशी केली जाणार आहे.
विद्यार्थी म्हणतात, ते आम्ही नव्हेच !
संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून बोर्डाने त्यांची सुनावणी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावली. त्यानंतर १५ मेपासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात आली, मात्र अजूनही निष्कर्श निघालेला नाही.