नक्षल्यांना शरणागती हाच पर्याय- सतीश माथूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:22 AM2018-04-24T04:22:26+5:302018-04-24T04:22:26+5:30
गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
मुंबई : नक्षलवाद्यांच्या चळवळीमध्ये नेतृत्व व गटातटावरून दुफळी निर्माण झाली असून, त्यातून अनेक अंतर्गत बाबींची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे नक्षल्यांना हत्यारे खाली ठेवून शरणागती पत्करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी आत्मसमर्पण करून स्वत:च्या व राज्याच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी केले.
गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. राज्य पोलीस दलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस महासंचालक माथूर म्हणाले,‘भामरागड येथील कस्नासूर जंगलात नक्षली जमल्याची माहिती मिळाल्यानंतर, पथकाने सुमारे दीड तास कारवाई करून १६ जणांना ठार केले. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली असून, यांच्यावर तब्बल ७६ लाखांचे बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती. त्यातील साईनाथ उर्फ डोलेश हा पेरमिली दलमचा म्होरक्या असून, त्याच्यावर तब्बल ७५ गुन्हे दाखल होते. त्याच्याकडून एके ४७ जप्त केले आहे. २०१६ साली पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. अन्य ५ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
नक्षली चळवळीबाबत विविध मते व्यक्त केली जात असली, तरी न्यायालयाने ज्यांना दोषी ठरविले आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सांगून माथूर म्हणाले, ‘नक्षलवाद्यांमध्ये विविध कारणांमुळे फूट पडली असल्याने, आम्हाला आता त्यांच्या हालचालींची तत्काळ(पिंक पाइट) माहिती मिळत आहे.
त्यामुळे कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा शरणागती पत्करणे, हाच त्यांच्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर, गेल्या ६ वर्षांत ६०५ जणांनी आत्मसर्मपण केले असून, त्यांच्या विकासासाठी ७ कोटींची मदत करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास ६० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला असून, या कालावधीत अभियानातील एकही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.’
आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर ते म्हणाले, ‘नक्षलविरोधी अभियानामध्ये अद्यावत शस्त्रसामुग्रीचा समावेश करण्यात आला असून, जवानांना एनएसजी कमांडोकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांच्या वाहनांवर हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर देण्यात येत आहे.
अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२६ जणांना वेगवर्धित पदोन्नती दिली असून, नुकत्याच एका अधिकाºयाला निरीक्षक पदाचे प्रमोशन दिले आहे. नक्षलवादी भागात विविध प्रकारच्या सुधारणांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, त्याला ५० कोटींपर्यंतचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत.’