आत्महत्याग्रस्तांच्या उंबरठ्यावर नुसतीच राजकीय वर्दळ

By admin | Published: September 16, 2016 01:50 AM2016-09-16T01:50:29+5:302016-09-16T01:50:29+5:30

त्या घरातल्या पिता-पुत्राने एकाच दिवशी एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्या दिवसापासून त्यांच्या उंबरठ्यावर राजकीय पावलांची वर्दळ वाढली आहे

The only political upheaval on the threshold of suicide victims is the political upheaval | आत्महत्याग्रस्तांच्या उंबरठ्यावर नुसतीच राजकीय वर्दळ

आत्महत्याग्रस्तांच्या उंबरठ्यावर नुसतीच राजकीय वर्दळ

Next

हरिओम बघेल , आर्णी (जि. यवतमाळ)
त्या घरातल्या पिता-पुत्राने एकाच दिवशी एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्या दिवसापासून त्यांच्या उंबरठ्यावर राजकीय पावलांची वर्दळ वाढली आहे. जो तो येतो अन् मदत देण्याच्या गोष्टी करतो. आश्वासनांचे फुगे उडवून, कॅमेऱ्यांना चेहरे दाखवून परत जातो. पण मदतीची दमडीही पोहोचली नाही. त्याहूनही भयंकर म्हणजे, अनेक प्रतिष्ठित लोक फोन करून आपण येणार असल्याचे सांगतात. आत्महत्याग्रस्त कुटुंबीय शेतात न जाता त्यांची वाट पाहातात. पण अचानक रात्री निरोप येतो, साहेब येऊ शकत नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही त्याच्या कुटुंबीयांची होणारी ही विटंबना सध्या आर्णी तालुका अनुभवतो आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील शेलू (शे.) गावात शेतकरी पिता-पुत्राने २३ आॅगस्ट २०१६ रोजी आत्महत्या केली. पिता काशीनाथ आणि पुत्र अनिल मुधळकर असे घरातले दोन कर्ते पुरुष गमावल्यावरही हे कुटुंब पुन्हा नव्या दमाने शेती करण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र, नजरेपुढे असलेल्या आर्थिक समस्या त्यांना रोखू पाहात आहेत. अशातच ‘सांत्वना भेटी’साठी येणाऱ्या ‘मान्यवरां’नी मुधळकर कुटुंबीयांचे दैनंदिन जीवनच ‘डिस्टर्ब’ करून टाकले आहे.
आत्महत्येच्या घटनेनंतर मुधळकर परिवार पूर्णत: कोलमडला. मृत काशीनाथच्या मागे विशाल, विश्वास, सुनील आणि संदीप ही चार मुले आहेत. अनिल नावाच्या मुलाने त्यांच्यासोबतच आत्महत्या केली. कुटुंबाचा भार आता विशालवर आहे. विश्वास जेसीबी मशिनवर काम करतो. मात्र, आत्महत्येच्या घटनेनंतर तो सावरुच शकला नाही. त्यामुळे बहीण त्याला आपल्या काळी टेंभी (ता. महागाव) गावाला काही दिवसांसाठी घेऊन गेली आहे. सुनील आणि संदीप हे दोघे लोणीच्या आश्रमशाळेत बाराव्या आणि सातव्या वर्गात शिकतात. पण वडिलांच्या आत्महत्येनंतर ते घरीच आहेत. त्यांच्या मुली सारिका, सुनीता, अनिता, प्रांजली प्रचंड खचल्या आहेत. विवाहित असलेली सारिका सासरी गेली. सुनीता, अनिता प्रांजली यांनी कसेबसे गावातल्या शाळेत जाणे सुरू केले.
घरात दोन आत्महत्या झाल्या तरी मुधळकर परिवाराला शेतात राबण्याशिवाय पर्याय नाही. पण सध्या ‘सांत्वना भेटी’च्या गर्दीमुळे त्यांना शेतात जाणेच अशक्य झाले आहे. घटना घडल्यापासून फक्त दोन दिवस माझी आई, पत्नी शेतात खत टाकायला गेल्या. मी दोनचार वेळा गेलो. आम्हाला दररोज कुणीतरी भेटायला येत आहे. भेटायला येणार म्हटले की आम्हाला घरीच थांबावे लागते. अनेकदा तर भेटायला येणारे लोक सांगितलेल्या वेळेवर येतही नाही. आम्हाला नुसती वाट पाहात बसावे लागते. यामुळे आम्हाला त्रासही होतो आहे, अशी व्यथा मुधळकर कुटुंबीयांनी मंगळवारी (१३ सप्टेंबर) ‘लोकमत’पुढे मांडली. घटनेनंतर मुधळकर कुटुंबीयांना भेटण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह हे दोघेही सोबतच आले. भेटून विचारपूस करून गेले. पालकमंत्र्यांनी शिवसेनेकडून मदत दिली. परंतु, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा अद्याप पत्ता नाही. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री येऊन गेल्यावरही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी हालचाल केलेली नाही. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वैयक्तिक २५ हजार रुपयांची मदत दिली. त्यांच्यासोबतच कृषी विभागाचे अधिकारीही आले होते. त्यांनी कोंबड्या, पीठगिरणी देण्याची घोषणा केली. परंतु, अद्याप कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे परतून पाहिले नाही. दुसरीकडे प्रकाश पोहरे यांनी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, अद्याप काहीच मिळाले नाही. काही लोकांनी थेट आमच्या बँक खात्यात रोख मदत जमा केली. काहींनी मनिआॅर्डर पाठविली. त्यांनी स्वत:चे नावसुद्धा सांगितले नाही. सर्वसामान्यांची ही तऱ्हा आहे, तर ‘मान्यवर’ मात्र गाजावाजा करत मदतीची भाषा करत आहे. याच भावनिक विटंबनेला आता मुधळकर कुटुंबीय कंटाळले आहे.


नागपूर : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या जोखडात अडकलेल्या विदर्भातील कास्तकाराच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढत असताना शासनाकडून हवी तशी मदत मिळत नाही. नापिकी आणि कर्जापायी आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा वाढतच जात आहे. विदर्भातील यवतमाळ,अमरावती आणि वर्धा जिल्ह्याची स्थिती तर फार बिकट आहे. आत्महत्याग्रस्त कास्तकाराच्या कुटुंबाची पार वाताहत झाली आहे. कसा उजाडतो त्यांचा दिवस, याचा आढावा घेणारे हे विशेष वृत्त.


केंद्रीय मंत्र्यांची हुलकावणी
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर येणार म्हणून आम्ही घरी थांबलो. रात्री ११ वाजले तरी आम्ही झोपलो नाही. लहान मुलीही जागतच होत्या. पण रात्री उशिरा मंत्री येणार नाही म्हणून निरोप आला, असे विशाल मुधळकर यांनी दु:खी अंत:करणाने सांगितले. काही मंडळी तर मदत देतो म्हणून मुधळकर कुटुंबीयांनाच त्यांच्या कार्यालयात बोलवत आहेत. त्यासाठी सर्व कुटुंबीयांना दैनंदिन कामे सोडून त्या ठिकाणी जावे लागत आहे.


‘‘शेती हेच आमचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यामुळे आता दु:ख आवरून आम्हाला शेतात काम केल्याविना पर्याय नाही. घरची शेती आहे. सोबत काही जमीन बटईने केली आहे. कृषी विभागाने आश्वासन पाळत पीठगिरणी दिली तर जोडधंदाही करता येईल. मान्यवर लोकांनी नुसत्या आमच्या घरी भेटी देण्यापेक्षा आमच्यासाठी काही तरी ठोस केले पाहिजे.’’
- विशाल मुधळकर, मृत काशीनाथ यांचा मुलगा, शेलू (शे.)


नातेवाईकांचा दिलासा
खचलेल्या मुधळकर कुटुंबाला धीर देण्यासाठी मृत काशीनाथचे वृद्ध सासरे लक्ष्मण धोत्रे (रा. बोरगाव) सरसावले आहेत. घटनेपासून ते मुधळकर कुटुंबासोबतच आहेत. मोठ्या मुलाचे सासरे तुकाराम पवार हेही मुधळकर परिवारासोबत आहेत. पोकळ आश्वासनांपेक्षा या नातेवाईकांचे सोबत राहणे मुधळकर कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

Web Title: The only political upheaval on the threshold of suicide victims is the political upheaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.