भाजपा सरकारकडून केवळ आश्वासने
By admin | Published: June 9, 2016 02:18 AM2016-06-09T02:18:58+5:302016-06-09T02:18:58+5:30
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने दोन वर्षांत ठळक कामगिरी केली
देहूरोड : भरमसाठ आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने दोन वर्षांत ठळक कामगिरी केली नसून, त्यांच्याकडून अद्यापही केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत. जनतेसाठी अच्छे दिन यायला आणखी किती दिवस लागणार आहेत? सत्तेवर आल्यावर दर वर्षी चार करोड बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. आजतागायत किती बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या? कॅन्टोन्मेंट बोर्डाला ‘सीईओ’ कधी मिळणार? असे सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी येथे उपस्थित केले.
कॅन्टोन्मेंट परिसरातील विविध समस्या जाणून घेण्याकरिता जगताप येथे आले होते. त्या वेळी जगताप म्हणाले, केंद्रात व राज्यात एकाच सरकार असताना जनतेचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही भाजपाची सत्ता असतानाही गेल्या पाच महिन्यांपासून बोर्डाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालला आहे. नवीन ‘सीईओ’ कधी रुजू होणार? गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेली विकासकामे कधी सुरू होणार? अच्छे दिन, बेरोजगारीच्या प्रश्नावर फक्त आश्वासने देण्यात येत असून, सरकारकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.
बोर्डाचे सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गंगूताई खळेकर, इलीहास खान, जावेद सिकीलकर, बाळासाहेब पिंजण, मोहन राऊत, जयसिंग टी. शंकर, शिवा कंदस्वामी, नंदकिशोर यादव, ज्योती वैरागर, गफुरभाई शेख यांनी मनोगतात विविध समस्या विशद केल्या. अशोक कुसळे, टी. शेकन्ना, माणिक वाघमारे, नरसम्मा बेगवाडे, संभाजी पिंजण, लक्ष्मण धिलोड, गणेश पिंजण, संदीप जाधव, पोपट मोहिते, अनिकेत मुळीक , आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन, शंकर टी. जयसिंग यांनी आभार मानले. (वार्ताहर)