घाईघाईत दिले फक्त पुरवणीचे गुण!, निकालावर नापासचा शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:31 AM2017-08-12T04:31:17+5:302017-08-12T04:31:31+5:30
मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत. त्यामुळे हुशार विद्यार्थीही नापास झाले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
आॅगस्ट महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे १०० हून अधिक निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. त्यातच कुलगुरू डॉ. संजय देशमुख सुट्टीवर गेले आहेत. निकाल कधी लागणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतानाच, आता उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या जातील का, हक्काचे गुण तरी मिळतील का, असा नवा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात कमी गुण म्हणजे, १० ते १५ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी नापास झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे पत्र पाठवून खंत व्यक्त केल्याचे समजते.
विज्ञान शाखेनंतर अन्य निकालांमध्येही सावळागोंधळ आहे. विद्यार्थ्यांना १०० पैकी फक्त १५ ते २० गुणच देण्यात आले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे इतके कमी गुण कसे मिळू शकतात? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही पडला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे विचारणा केली असून, विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत.
स्कॅनिंगमुळे गोंधळ
काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, पण पुरवण्या मिळत नसल्याने गोंधळ सुरू आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना एक-एक पान वेगळे करण्यात आले. त्यामुळे वेगवेगळ््या प्राध्यापकांकडून ते तपासण्यात आले. त्यामुळेच हा गोंधळ झाला, अशी कबुुली परीक्षा विभागातील एका अधिकाºयांनी दिली.
आता तरी डेडलाइन पाळणार का?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने स्वत:च १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे. या डेडलाइननुसार, मुंबई विद्यापीठाच्या हातात फक्त ४ दिवस उरले असतानाही शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत विद्यापीठापुढे सुमारे पावणेदोन लाखांच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ दरदिवशी सरासरी १६ ते २० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निर्णयात मुंबई विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे.
डेडलाइन संपायला शेवटचे चार दिवस उरले आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणीचा वेग जैसे थेच आहे. मुंबई विद्यापीठात शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत एकूण १६ हजार २१५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, अजूनही १ लाख ७४ हजार ६८२ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. शुक्रवारी, विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीसाठी फक्त ९६६ प्राध्यापक आले होते. याच वेगाने उत्तरपत्रिका तपासणी सुरू राहिली तर मॉडरेशन कधी आणि निकाल कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. १५ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर न झाल्यास निकालाची तिसरी डेडलाइन चुकल्याचा ठपका विद्यापीठावर लागणार आहे.
१,८१,५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी
मुंबई विद्यापीठात शुक्रवारी एकूण ९ हजार २५९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून ७ हजार २५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. १ लाख ८१ हजार ५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. तर, ५९ हजार ६५५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन बाकी आहे.