स्टॉल्सवर केवळ ‘रेल नीर’च का?
By admin | Published: January 7, 2016 02:18 AM2016-01-07T02:18:48+5:302016-01-07T02:18:48+5:30
रेल्वे प्लॅटफॉमवरील स्टॉल्समध्ये अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ विकण्याची मुभा असताना केवळ ‘रेल नीर’ या एकाच ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी का?
मुंबई : रेल्वे प्लॅटफॉमवरील स्टॉल्समध्ये अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ विकण्याची मुभा असताना केवळ ‘रेल नीर’ या एकाच ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी का? अशी विचारणा बुधवारी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाकडे करत, चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
ज्या कंत्राटदारांचे आणि केटरर्सचे रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉल्स आहेत, त्यांना स्टॉल्सवर केवळ ‘रेल नीर’चेच बाटलीबंद पाणी उपलब्ध करावेत, असे परिपत्रक गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने काढले. या परिपत्रकाला लोपेश वोरा या प्रवाशाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. वोरा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.
अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ रेल्वे स्टॉल्सवर उपलब्ध असतात, मग पाणी का उपलब्ध नाही? तुम्ही (रेल्वे) अन्य ब्रँड्सचे पाणीही स्टॉल्सवर उपलब्ध करायला हवे. आयआरसीटीसीचे नुकसान होत आहे, असे तुमचे म्हणणे असेल, तर तिकीट बुक करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला रेल नीरची एक बाटली मोफत द्या. प्रवाशांना ‘रेल नीर’ घेण्यासाठी प्रोत्साहित करा,
अशी सूचना खंडपीठाने रेल्वेला
केली. (प्रतिनिधी)