अवघे ठाणे बनले मराठामय

By Admin | Published: October 17, 2016 03:02 AM2016-10-17T03:02:23+5:302016-10-17T03:02:23+5:30

ठाण्यातही या मोर्चाने गर्दीचा विक्रम मोडीत काढून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने हा मूक मोर्चा यशस्वी करून दाखवला.

Only Thane became Maratha | अवघे ठाणे बनले मराठामय

अवघे ठाणे बनले मराठामय

googlenewsNext


ठाणे : राज्यात ठिकठिकाणी ज्या पद्धतीने मराठ्यांचे क्रांती मोर्चे निघाले होते, त्याचपद्धतीने ठाण्यातही या मोर्चाने गर्दीचा विक्रम मोडीत काढून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने हा मूक मोर्चा यशस्वी करून दाखवला. मोर्चामुळ रविवारी सकाळपासूनच ठाणे शहर मराठामय झाले होते. सकाळी रेल्वेतून, बसमधून, खाजगी वाहनांतून उतरणारी भगवी गर्दी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जसजसा जमाव एकत्र होत गेला, आपला हुंकार सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकवटत गेला, तसे या अथांग जनसमुदायाचे विराट रूप ठाणेकरांना पाहायला मिळाले.
तीनहातनाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहाजवळ हा मोर्चा विसर्जित झाला. या मोर्चामुळे संपूर्ण शहर भगवे बनले होते. ठिकठिकाणी हातात भगवे झेंडे घेतलेले मोर्चेकरी, चौकाचौकांत लावलेले फलक, झेंडे, छत्रपती शिवरायांच्या पोशाखात सहभागी झालेली लहान मुले या मोर्चाचे खास आकर्षण ठरले. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही बिघडू नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. याची काळजी जशी वाहतूक पोलिसांनी घेतली, तशीच मोर्चात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनीही घेतली आणि अतिशय शिस्तबद्धरीत्या आणि शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा मराठा समाजबांधवांनी यशस्वी करून दाखवला.
मोर्चा सकाळी १० वाजता निघणार असला, तरी त्याची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू होती. पूर्वसंध्येला ठिकठिकाणी या मोर्चाच्या व्यवस्थेबाबत रंगीत तालमी घेण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासूनच मोर्चेकरी जसे जमेल, तसे तीनहातनाक्यावर जमा होत होते. महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग अशा पद्धतीने मोर्चात सहभागी होण्याचा नियम ठरवण्यात आला होता.
सकाळी १०.४५ च्या सुमारास जिजाऊंना मानवंदना देत हा मोर्चा मार्गक्रमणा करू लागला. मल्हार चित्रपटगृहामार्गे गोखले रोड, गावदेवी मैदानाला वळसा घालून पुढे जांभळीनाका, कोर्टनाका असे करीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहाजवळ ‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत हा मोर्चा विसर्जित झाला.
कोंडी होऊ नये, वाहनांना जागा देण्यासाठी ठिकठिकाणी उद््घोषणा सुरू होत्या. तीनहातनाक्यावर येण्यासाठी मुलुंड चेकनाका, आनंदनगर चेकनाका, नितीन, कॅडबरी कंपनीपर्यंत लाखोंचा भगवा जनसमुदाय दिसत होता. खाजगी वाहनांमुळे कोंडी होऊ नये, यासाठी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द करून ४० अतिरिक्त लोकल सोडल्या. मोर्चाच्या मार्गावर सीसीटीव्ही आणि वॉच टॉवर्सद्वारे लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत कक्ष आणि आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. व्हिडीओ शूटिंग सुरू होते. तर, ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही नजर ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Only Thane became Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.