सेना-भाजपा एकत्र लढले तरच सत्ता
By admin | Published: September 20, 2014 02:17 AM2014-09-20T02:17:29+5:302014-09-20T02:17:29+5:30
राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल.
Next
रामदास आठवले : सेनेने ताठर भूमिका सोडून एक-दोन पावले मागे यावे
शांतीलाल गायकवाड - औरंगाबाद
राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल. मात्र ते स्वतंत्र लढल्यास काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. हे ध्यानी घेऊनच युती तोडणार नाही, असे आश्वासन भाजपाने दिले असून, आता शिवसेनेनेही एक-दोन पावले मागे आले पाहिजे, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिला. आठवले यांनी शुक्रवारी औरंगाबादेत ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.
युती टिकेल काय? टिकल्यास पुढे प्रामाणिकपणो एकमेकांची कामे होतील?
आठवले : भाजपा संसदीय मंडळाने युती न तोडण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. भाजपा एक पाऊल मागे आली आहे. शिवसेनेने एक-दोन पावले मागे यावे. शिवसेनेची रविवारी बैठक होत आहे. त्यात उद्धव ठाकरे नरमाईची भूमिका घेतील, असा आपल्याला विश्वास आहे. 225 जागा जिंकून महायुतीची सत्ताही येणार आहे; परंतु महायुती एकत्र लढली तरच, हे शक्य आहे.
महायुती तुटली तर रिपब्लिकनची भूमिका काय राहील?
आठवले : महायुती टिकणार आहेच. आम्ही महायुतीसोबतच राहणार. आम्हाला दुसरा पर्याय नाहीच.
प्रश्न : महायुतीतील चार घटक पक्षांना 18 जागा सोडून सेना-भाजपा एकमेकांच्या जागांसाठी का भांडते आहे?
आठवले : आम्हाला दोन आकडी जागा हव्या आहेत. जागा कमी झाल्यास विधान परिषद, महामंडळे दिली पाहिजेत. आम्ही ताठर भूमिका घेणार नाही. आम्हाला सत्तेत योग्य वाटा द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.
उत्तराखंड, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला. मोदी लाट ओसरली असे वाटते?
आठवले : पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला हे खरंय. देशात इतरत्र मोदी लाटेवर लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या. महाराष्ट्रात लोकसभेतील महायुतीच्या विजयात मोदी लाटेसह, काँग्रेसविरुद्धचा रोष आणि महायुतीची एकत्रित ताकद हे घटक कारणीभूत आहेत. विधानसभेतही हे तिन्ही घटक टिकून आहेत. विधानसभा आम्हीच जिंकणार.
महायुतीतील लहान मित्रपक्षांना बेसावध ठेवण्यासाठीच सेना-भाजपाने युतीत तणाव निर्माण केला, अशी चर्चा आहे.
आठवले : नाही. मला तसे वाटत नाही. लोकसभेच्या निकालापासून, अगदी सुरुवातीपासूनच भाजपा अधिक जागा मागण्याच्या मूडमध्ये होती, तर शिवसेना मागच्या फॉम्यरुल्यावर कायम होती. त्यामुळे जागावाटपावर बोलणीच सुरू होऊ शकली नाही.