...तरच बारसू प्रकल्प सुरु होईल, रेटून होणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचे महाबळेश्वरमध्ये महत्वाचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:27 PM2023-04-25T23:27:23+5:302023-04-25T23:33:36+5:30
काससह महाबळेश्वरच्या निसर्गाला बाधा आणणारी बांधकामे पाडणार, जुन्या बांधकामांना विरोध नाही : नवीन बांधकामे खपवून घेणार नसल्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कास आणि महाबळेश्वर ही दोन्ही पर्यटनाची महत्वाची ठिकाणे आहेत. जुन्या लोकांची घरे आणि त्यांनी सुरु केलेले व्यवसाय यांना कोणीही हात लावणार नाही. मात्र, दोन्ही ठिकाणचे निसर्गसौंदर्य धोक्यात आणणारी आणि नियम न पाळणारी बांधकामे पाडली जातील, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसे आदेश प्रशासनाला दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वर येथे विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासनाची भूमिका स्पष्ट आहे. जुनी बांधकामे पाडणार नाही. त्याठिकाणी स्थानिक लोक रोजगार, स्वयंरोजगार करतात. पण, नवीन बांधकामे रस्त्यात होतात ती खपवून घेतली जाणार नाहीत. महाबळेश्वरमधील बकालपणा खपवून घेतला जाणार नाही. ते हिल स्टेशन आहे. तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शासन योग्य ती कारवाई करेल.
महाबळेश्वर विकास आराखडा, सुशोभिकरण, रस्ते. दिवाबत्ती, वाहतूक कोंडी यावर या बैठकीत आढावा घेण्यात आला. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, तसेच स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन तयार आहे. जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. आढावा पालकमंत्री पुन्हा घेतील. अपेक्षित महाबळेश्वर पर्यटन वाढीच्या दृष्टीने, पार्कींगची चर्चा झाली आहे. यातून मार्ग निघेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.
तापोळा विकासासाठी १००० कोटींची कामे सुरु
तापोळा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूमीपूजन केले आहे. त्याचाही फायदा तापोळा भागातील लोकांना होईल. पर्यटनासाठी याठिकाणी ९०० ते १००० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. तापोळा ते अहिर ब्रिजची पाहणी केली. हा पूल मे २४ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या पूलामुळे महाबळेश्वरच्या पर्यटकांना आनंद घेता येईल. याचबरोबर रघुवीर घाटातून जो रस्ता येतो. तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला गेला पाहिजे. यासाठी दरे ते बामणोली पुल झाला तर कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. वासोटा किल्ल्याला पर्यटक जातात. कोयना कांदाटी फेस्टिव्हलचे पालकमंत्री, खासदार आमदार यांची संकल्पना आहे तो देखील होईल, असे शिंदे म्हणाले.
अडीच वर्षे घरात बसणाऱ्यांनी काहीही बोलावे का..
मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सक्तीच्या रजेवर आहेत अशी चर्चा आहे. यावर बोलताना ते म्हणाले, मी या भागातील महत्वाच्या कामांसाठी आलो आहे. जनता दरबार घेतला. त्याचे महत्वाचे प्रश्न सोडविले. विविध कामांचा आढावा घेत आहे. ही कामे देखील महत्वाची आहेत. त्यामुळे जे अडीच वर्षे घरी बसलेले आहेत त्यांनी दोन तीन दिवस रजेवर गेले, अशी चर्चा करत असतील तर त्यांना काय म्हणावे. त्यांना काय चर्चा करायची ती करू देत. त्यांच्यासाठी वेगळे शब्द माझ्या डायरीत आहेत. पण, त्याचा योग्य वेळी वापर करेन, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
नाणार प्रकल्प मंजूर केला तेव्हा काय तडजोडी झाल्या का...
नाणार प्रकल्पाला विरोध सुरु आहे. बारसू या ठिकाणी त्याचे काम सुरु आहे. ती ग्रीन रिफायनरी आहे. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी. अशी अपेक्षा होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यावेळी असे का केले. तेव्हा काय विशेष तडजोडी झाल्या होत्या का. असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
समृद्धी हायवेलाही सुरुवातीला विरोध केला. गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यालाही विरोध केला. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा आहे. लोकांच्या संमतीने माती परीक्षण केले जात आहे. लगेच प्रकल्प सुरु होणार नाही. माती परीक्षण झाल्यानंतर त्या प्रकल्पासाठी जमीन उपयुक्त असेल तरच प्रकल्प सुरु होईल. हा प्रकल्प रेटून होणार नाही, असेही शिंदे म्हणाले.