ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाली, तरच देश महासत्ता होईल!
By admin | Published: February 6, 2016 12:10 AM2016-02-06T00:10:25+5:302016-02-06T00:10:25+5:30
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभ.
अकोला : देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पाणी, वीज उपलब्ध नसल्याने शेती विकासाची गती खुंटली आहे. देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीवर भर दयावा लागणार असून, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्मीती करावी लागणार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 वा दीक्षांत समारंभात गडकरी यांनी दीक्षांत दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे, इथिओपीयाचे माजी राजदूत टीबोर पी. नाझ (अमेरिका), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुलसचिव ओमप्रकाश अग्रवाल, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपिकीशन बाजोरीया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, गोपी ठाकरे, डॉ. जयंत देसाई, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंदराव भराड, डॉ. मोतीलाल मदान, डॉ. शरद निंबांळकर, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. व्ही.एम.भाले, डॉ. महेंद्र नागदेवे आदिंची दीक्षांत पिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गडकरी यांनी कृषी विकासावर चिंता व्यक्त केली. अपुर्या सिंचन व्यवस्थेचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. देशातील कृषी क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर पाणी महत्वाचा घटक असून, त्याकरिता पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंवर्धन करावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. कृषी विद्यापीठांनी कमी पावसात जास्त उत्पादन देणारे वाण विकसीत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारचे मनुष्यबळ विकसीत करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी रोजगारभिमुख कुशल मनुष्यबळ निर्माण करावे. त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना संशोधनामध्ये कमालीची सुधारणा घडवून आणावी लागणार आहे. कोळशावर आधारित युरीया, मिथेन, इथेनॉलशी संबंधित उद्योगांकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
भारत-अमेरिकेचे संबध दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रांचे ठोस प्रयत्न दिसत असल्याचे सांगून, मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय उद्योग भारतामध्ये अधिकाधिक गुंतवूणक करीत असल्याचे टीबोर पी. नाझ यांनी स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भारत आणि अमेरिकेतील व्दिपक्षीय व्यापार सुमारे १0 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यत पोहोचला आहे. पुढील काही वर्षात तो ५00 अब्ज डॉलरपर्यत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या शतकामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत, अमेरिका आणि चीन या देशांचा मोठा वाटा आहे, हे मान्य असले तरी अर्थशास्त्रज्ञांची मते मात्र भिन्न आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारत अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचे विवेचन केले.
कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती प्रास्ताविकातून दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाला शेतकरी समुपदेशन केंद्र देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सेंद्रिय शेती उत्पादन निर्यात करण्यासाठी गुणवत्ता तपासणी केंद्राची मागणीही त्यांनी केली.
या दीक्षांत समारंभात कृषी अभ्यासक्रमाच्या १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट गुणांक प्राप्त करणार्या विविध शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे यावेळी देण्यात आली.
विद्यापीठात निवडणुकीचे राजकारण
विद्यापीठात निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण शिरल्याने त्याचे परिणाम अलीकडे दिसू लागले आहेत. ज्ञानाची विद्यापीठे राजकीय अड्डे न करता ज्ञानवंत, कुशल विद्यार्थी घडवावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला.