राज्यातील एकमेव काटेरी फणस कोल्हापुरात; निरफणस वृक्षाशी साधर्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:46 AM2021-10-18T10:46:53+5:302021-10-18T10:47:05+5:30
लवकरच शास्त्रीय नोंद होणार
- संदीप आडनाईक
कोल्हापूर : राज्याच्या वनस्पती कोषात नोंद नसलेला ‘ब्रेडनट’ हा वृक्ष कोल्हापूर शहरात आढळला असून, सर्वांना परिचित असलेल्या निरफणस वृक्षाशी याचे साधर्म्य आहे. याविषयी अधिक संशोधन होण्याची गरज असली तरी देशात याची ही एकमेव प्रजात असावी, असा अंदाज वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केला आहे. याची लवकरच शास्त्रीय नोंद होणार आहे.
‘ब्रेडनट’ या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘ॲरटोकार्पस क्रामान्सी’ असे असून, तो मोयेएसी म्हणजेच वड, फणसाच्या कुळातील आहे. हा वृक्ष सहा ते आठ मीटर उंच वाढतो. मुख्य खोडापासून अनेक फांद्या चारही बाजूंनी पसरतात. खोडात, फांद्यात पांढरा चीक असतो. नर १५ ते २० सेंमी लांब असून, खाली झुकलेला, तर मादी फुलोऱ्यात किंजे एकवटून व आसनवाढीने गुरफटलेली असते. फळ नारळाएवढे असून, त्यावर देशी फणसासारखे काटे असतात. फळांतील गर पांढरट असतो. ब्रेडनेट विदेशी वृक्ष असून, तो मूळचा फिलिपाइन्स, न्यू गिनिया, इंडोनेशियातील मालुकू बेटावरील आहे. भारतात या वृक्षाची अद्याप नोंद नाही. फळे शिजवून, भाजून किंवा तळून खातात. याची रोपे तयार होतात. कोल्हापूर शहर परिसरातील पोवारनगर, मोरेवाडी, लक्ष्मीपुरी येथे या वृक्षाचा आढळ झाला असून, तो हुबेहूब निरफणसासारखाच दिसतो.