Maratha Reservation: ठाण्यात वाहणार केवळ श्रद्धांजली, कोणत्याही स्वरूपाचा ‘बंद’ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:36 AM2018-08-09T05:36:07+5:302018-08-09T05:36:57+5:30
सकल मराठा समाजाने आयोजित केलेला ९ आॅगस्टचा ‘बंद’ ठाण्यात असणार नाही.
ठाणे : सकल मराठा समाजाने आयोजित केलेला ९ आॅगस्टचा ‘बंद’ ठाण्यात असणार नाही. या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत शहरातील विविध सहा ठिकाणी २१ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे समन्वय समितीने स्पष्ट केले. मात्र, पोलिसांनी खबरदारी म्हणून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून ठिकठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितले. तसेच ड्रोनद्वारे आंदोलकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नाही. समाजातील तणाव वाढू नये, म्हणून हा निर्णय सर्वानुमते ७ आॅगस्ट रोजी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुतात्म्यांना सकाळी १० ते ११ वा. या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी, शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अष्टविनायक चौक (कोपरी), कळवा नाका, वर्तकनगर नाका, वागळे प्रभाग समिती, सूरज वॉटर पार्क (वाघबीळ) या सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्ता रोको अथवा घोषणाबाजी होणार नसल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले.
>पालघरमधील आंदोलन स्थगित
तलासरी : सकल मराठा समाजाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन पालघर जिल्ह्णात स्थगित केले आहे. आंदोलनाचे जिल्हा आणि सर्व तालुका समन्वयक यांची जिल्हा पोलीस प्रमुख व अन्य अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी बैठक घेतली.
वसतिगृह तातडीने सुरू करणे, शिष्यवृत्तीच्या रकमेचा प्रश्न तातडीने सोडविणे व अन्य मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या मागण्या कालबद्ध स्वरूपात मान्य न झाल्यास, पुन्हा आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. कल्याण येथेही बंद पाळता शांततेत ठिय्या करण्यात येणार आहे. मात्र, म्हारळ येथे क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे.
>रायगडमध्ये बंदची हाक
अलिबाग : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत. आंदोलन शांततेत करण्यात येणार आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात होणारे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
विविध व्यापारी असोसिएशन, कापड विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, खासगी आस्थापनांना रायगड बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलनाच्या पाशर््वभूमीवर महाड शहरामध्ये बुधवारी पोलिसांनी संध्याकाळी संचलन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे पोळ, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
>आधी पाहू मग ठरवू, एसटी महामंडळाची भूमिका
राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे ३५० पेक्षा एसटीचे नुकसान झाल्यामुळे महामंडळाने गुरुवारी ‘आधी पाहू मग ठरवू,’ अशी भूमिका घेतली आहे. एसटी मार्गस्थ करण्याची वेळ आलीच तर पुरेशा बंदोबस्तात आणि एसटीला जाळ््या बसवून चालवा. कर्मचाºयांच्या रजा रद्द करा, असे आदेशही आहे. आंदोलनातून होणाºया हिंसाचारातून एसटीचे नुकसान होते शिवाय वेळप्रसंगी प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राज्यातील बहुतांश एसटी स्थानकांवर, एसटीमध्ये प्रवाशांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात येत आहे. बुधवारी, मुंबई सेंट्रल स्थानकावर अशी माहिती पत्रके वाटण्यात आल्याचे मुंबई सेंट्रलचे प्रभाकर श्रीरंग बर्गे यांनी सांगितले.
>नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप
नवी मुंबई : सकल मराठा आरक्षणासाठी गुरुवारी होणाºया आंदोलनातून नवी मुंबईला वगळण्यात आले आहे. त्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, दंगल निवारण पथक यांच्या तुकड्या शहरातल्या सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी सज्ज करण्यात आल्या आहेत. या दरम्यान कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नसल्याचे पोलिसांकडून सूचित करण्यात आले आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनानंतरही मराठा आरक्षणासाठी गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे. मात्र, या आंदोलनात नवी मुंबई सहभागी होणार नसल्याचे सकल मराठा समन्वय समिती व माथाडी नेत्यांच्या वतीने मंगळवारीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतरही काही संघटनांनी तसेच स्वतंत्र मराठा कार्यकर्त्यांनी शहरात आंदोलनाचा इशारा दिला आहे, यामुळे शहरात पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध मराठा असा वाद उद्भवून तणाव निर्माण होऊ शकतो.
याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच पोलीस बंदोबस्तावर नेमले असून, त्यांच्या सोबतीला शीघ्र कृती दल, दंगल निवारण पथक याशिवाय राज्य राखीव पोलीस बलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पनवेलमध्ये बंद आंदोलन होणार आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसंनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी पोलिसांनी पनवेलमध्ये परेड केली.
>सिंधुदुर्गमध्ये जेलभरो, बंद नाही
सिंधुदुर्ग : सकल मराठा समाजातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ आॅगस्टला जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र, यात सिंधुदुर्ग बंद नाही, फक्त जेलभरो आहे. त्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली. या आंदोलनामुळे जिल्हातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, होऊ देणार नाही असे स्पष्ट आश्वासन सुहास सावंत यांनी दिले. याबाबत त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये प्रेस नोट द्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
>रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
रत्नागिरी : रत्नागिरीत बंदची हाक देण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे निमंत्रक केशवराव इंदूलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सकाळच्या सत्रातील गाड्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.