ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 11:19 AM2024-06-05T11:19:30+5:302024-06-05T11:20:21+5:30
Maharashtra BJP Eknath Shinde Politics: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यापैकी निम्म्याहून अधिक खासदारांना ते निवडून येणार नाहीत असा सर्व्हे दाखवून त्यांची तिकीटे कापण्यात आली होती. यामुळे शिंदे गटात नाराजी होती.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत आता महाभारत रंगण्याची चिन्हे आहेत. उमेदवारांच्या तिकीट कापण्यावरून सुरु झालेली नाराजी आता एकमेकांची मते एकमेकांना रुपांतरीत केली नाहीत अशा टीका सुरु होणार आहेत. त्यात भाजपावर मोठी नामुष्की ओढविली आहे. भाजपाने कथित सर्व्हेच्या नावाखाली शिंदे गटातील खासदारांची तिकीटे कापली होती. परंतु, आपल्या खासदारांना पुन्हा उभे केले होते. यापैकी केवळ २ खासदारच पुन्हा निवडून आले आहेत.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यापैकी निम्म्याहून अधिक खासदारांना ते निवडून येणार नाहीत असा सर्व्हे दाखवून त्यांची तिकीटे कापण्यात आली होती. यामुळे शिंदे गटात नाराजी होती. खासदारांची तिकीटे कापल्याने आमदारांच्या मनातही धाकधुकीचे वातावरण होते. आपलीही तिकीटे कापली जातील अशी भीती या आमदारांना वाटत होती. आता या खादारांचे तिकीट कापणाऱ्या भाजपाला स्वत:चे खासदारही निवडून आणता आलेले नाहीत.
भाजपाचे फक्त रक्षा खडसे आणि नितीन गडकरी असे दोनच खासदार पुन्हा जिंकले आहेत. २०१९ मध्ये भाजपाचे २३ खासदार होते. कालच्या निवडणुकीत भाजपाचे ९ खासदार निवडून आले आहेत. यातही रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा आणि पालघर या नव्या जागा आहेत. म्हणजेच भाजपाला २३ पैकी केवळ सहाच जागा राखता आल्या आहेत. यातही दोन खासदार जुनेच आहेत.
भाजपाला जालना, धुळे, भिवंडी, सांगली, बीड, अहमदनगर, भंडारा आदी गड राखण्यात अपयश आले आहे. आता शिंदे गटातील नाराजी समोर येण्याची शक्यता आहे. ज्या भाजपने सर्व्हेच्या नावावर आपल्या खासदारांची तिकिटे कापली त्या भाजपला स्वत:चेच खासदार निवडून आणता आले नाहीत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. तेथे काँग्रेसने जिंकलेल्या पाच पैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया या गृहजिल्ह्यात नवखे डॉ. प्रशांत पडोळे यांनी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना झाला.