बंडखोरीला अर्थ मिळाला तरच काही उपयोग!
By admin | Published: August 4, 2014 03:24 AM2014-08-04T03:24:00+5:302014-08-04T03:24:00+5:30
काही तरी नवीन करायच्या नादात मुले बंडखोरी करतात.
पुणे : काही तरी नवीन करायच्या नादात मुले बंडखोरी करतात. मात्र ज्याच्या विरुद्ध बंडखोरी करायची त्याची संपूर्ण माहिती व इतिहास जाणून घेऊन मगच करावी. तरच त्या बंडखोरीला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. हेच रंगभूमीच्या बाबतही लागू होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे होणाऱ्या पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. त्यात पटेल यांच्या हस्ते ‘पुरुषोत्तम’च्या इतिहासाची वेगळ्या पद्धतीने असलेल्या ‘रंगवही’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
५० वर्षांतील पुरस्कार विजेत्या विद्यार्थी लेखकांच्या एकांकिकांचे संकलन केलेल्या संग्रहाचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी प्रकाशन केले.
पटेल म्हणाले, ५० वर्षांतील स्पर्धेचा पटच या पुस्तकांच्या माध्यमातून उलगडला आहे. आधीचे साधे सोपे छानच होते. परंतु आता गुंतागुंतीचे असूनही छानच आहे. मी ‘पुरुषोत्तम’मध्ये सलग दोन वर्षे करंडक जिंकला. पण त्यानंतर थांबलो. कारण कलावंतांनी स्वत:ला आवरायला शिकायला हवे. दुसऱ्यांनाही वाव द्यायला शिकायला हवे. कलावंतात माणुसकीचा सच्चेपणा असायला हवा. तोच सच्चेपणा रंगभूमीवरही मांडता यायला हवा. तठस्थपणे नाटके लिहिता व मांडता यायला हवी. (प्रतिनिधी)