पाऊस वेळेवर आला तरच मुगाची पेरणी!
By admin | Published: June 11, 2016 02:48 AM2016-06-11T02:48:04+5:302016-06-11T02:48:04+5:30
सप्टेंबर महिन्यात मुगाल प्रतिक्विंटल ८,५00 दर मिळणार; केंद्रीय कृषी विपणन केंद्राचे भाकीत.
अकोला: वेळेवर पाऊस न आल्याने मागील दहा वर्षांपासून मुगाचे उत्पादन कमी झाले आहे. यावर्षीही जून महिन्याचे दहा दिवस संपले तरी पाऊस नसल्याने मुगाच्या पेरणीबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे; परंतु कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने येत्या सप्टेंबर महिन्यात मुगाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.
मूग हे कोरवाहू पीक असल्याने जून ते जूलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पेरणी केली जाते. पेरणीनंतरही पिकाच्या वाढीनुसार पावसाची गरज असते; परंतु मागील दहा वर्षांत अनेकदा वेळेवर पाऊस आला नाही आणि पेरणीनंतर खंड पडल्याने मुगाचे उत्पादन घटले आहे. यावर्षी शेतकर्यांनी मुगाचे नियोजन केले; पण पेरणीलायक पावसाचा पत्ता नसल्याने मुगाच्या पेरणीबाबत याही वर्षी शेतकरी संभ्रमावस्थेत आहे.
महाराष्ट्र हे मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मुगाचे उत्पादन कमी झाल्याने अलीकडे त्याचे दर नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहेत. या सर्व परिस्थितीचा व बाजारपेठेचा आढावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था, कृषी विपणन केंद्राच्या संशोधन चमूने घेतला आहे. या चमूने लातूर बाजारपठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील मुगाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले आहे. त्यांनी केलेला अभ्यास व निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील सद्य:स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात, वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार मुगाचा सप्टेंबर २0१६ या महिन्यात सरासरी दर आठ ते साड हजार रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे.