काम असेल तरच पालिकेत थांबा!
By admin | Published: July 2, 2016 02:00 AM2016-07-02T02:00:34+5:302016-07-02T02:00:34+5:30
महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यासह नागरिकांच्या भेटीची वेळही निश्चित केली
पिंपरी : महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यासह नागरिकांच्या भेटीची वेळही निश्चित केली आहे. अशातच आता महापालिका भवनातील चारही मजल्यांवरील गॅलरीतील कॅम्पसमध्ये विनाकारण उभे राहण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे. ही शिस्त महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी लावली आहे.
महापालिका भवनाची इमारत चार मजल्यांची आहे. तळमजल्यात नगररचना, लेखा विभाग, करसंकलन, नागरवस्ती आदी विभाग आहेत, तर पहिल्या मजल्यावर स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा विभाग आणि दुसऱ्या मजल्यावर बांधकाम परवाना, वैद्यकीय आणि स्थानिक संस्था कर या विभागांसह शिक्षण मंडळ हे महत्त्वाचे विभाग आहेत, तर तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता यासह इतर पक्षांची कार्यालये आहेत. चौथ्या मजल्यावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयांसह प्रशासन, संगणक, आकाशचिन्ह परवाना हे विभाग आहेत. महापालिकेत विविध कामानिमित्त दिवसभरात अनेकजण येत असतात. त्यामुळे महापालिकेत वर्दळ असते. अनेकदा संबंधित विभागाच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली असते. यामुळे इतर नागरिकांना त्रास होतो. शिवाय कार्यालयापर्यंत जाण्यासही अडचण निर्माण होते. अनेक जण कॅम्पसमधील गॅलरीच्या कठड्यावरून खाली डोकावत असतात. कठड्यावर पिशव्या, बॅगा ठेवून काहीजण गप्पा मारत उभे असतात. त्यामुळे आता महापालिकेच्या चारही मजल्यांवरील मोकळ्या कॅम्पसमध्ये विनाकारण उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
कार्यालयासमोरील मोकळ्या कॅम्पसमध्ये कोणीही उभे राहू नये, यासाठी चारही मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मजल्यावरील विभागाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या कॅम्पसमध्ये कोणी उभे राहिल्यास त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. कार्यालयात काम असल्यास कार्यालयात बसण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.(प्रतिनिधी)
>आढावा बैठक घेऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न
तिसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची कार्यालये असल्याने त्यांच्याकडे पदाधिकारी येण्याचेही प्रमाण अधिक असते. त्यामुळे तिसरा मजला नेहमीच गजबजलेला असतो. नागरिकांना शिस्त लागावी यासाठी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये उभे राहण्यास मनाई केली आहे.
नवीन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले. यासह नागरिकांच्या भेटीची वेळदेखील निश्चित करण्यात आली. वेळोवेळी आढावा बैठक घेत कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर महापालिकेत शिस्तीची घडी विस्कटली होती. ती पुन्हा बसविण्याचा प्रयत्न नवीन आयुक्त करत आहेत.
अनेकजण विनाकारण गॅलरीत उभे राहत असल्याचे निदर्शनास आल्याने अतिरिक्त आयुक्त यांनी हा परिसर मोकळा ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. - एस. डी. चौधरी, सुरक्षा अधिकारी