मंत्रिमंडळाची बैठक खुली करा - शिवसेनेची मागणी
By Admin | Published: March 4, 2017 05:49 AM2017-03-04T05:49:50+5:302017-03-04T05:49:50+5:30
फडणवीस यांच्या पारदर्शी भूमिकेला पाठिंबा म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक खुली करा अशी मागणी केली
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी भूमिकेला पाठिंबा म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक खुली करा अशी मागणी केली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय जर या बैठकीत आपण घेत असू तर ही बैठक विरोधी पक्षनेते, लोकपाल, पत्रकार यांना खुली करा,अशी मागणी आपण मंत्रिमंडळ बैठकीत केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सेना मंत्र्यांनी शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही आग्रही मागणी करताना आक्रमक भूमिका घेतली होती असे सांगून शिंदे म्हणाले, यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यक असेल तर केंद्राला शिफारस करण्यात यावी. महाराष्ट्राने आजवर अनेक प्रगतिशील धोरणे देशाला दिली. पारदर्शक कारभारासाठी घटनादुरुस्तीची शिफारस केंद्राला करावी, अशी आमची मागणी आहे. शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती भूमिका मांडली, हे समजू शकले नाही. पण कोणकोणत्या गोष्टीत पारदर्शता आणावी असे शिवसेनेला वाटते त्याची यादी तयार करा, ती यादी आपण तपासून घेऊ आणि पारदर्शता आणण्याविषयी आमच्या मनात कोणतेही दूमत नाही अशी भूमिका त्याच बैठकीत आपण मांडल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. (विशेष प्रतिनिधी)