पाथर्डीत खुलेआम कॉपी
By admin | Published: March 19, 2017 12:37 AM2017-03-19T00:37:18+5:302017-03-19T00:37:18+5:30
दहावी व बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन परीक्षेतील गैरप्रकाराला अटकाव करु शकलेले नाही.
पाथर्डी (अहमदनगर) : दहावी व बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन परीक्षेतील गैरप्रकाराला अटकाव करु शकलेले नाही. पुणे बोर्डापर्यंत कॉपी रॅकेटचे धागेदोरे आहेत की काय?, अशी शंका त्यामुळे निर्माण झाली.
परीक्षेतील गैरप्रकारांमुळे पाथर्डी तालुला बदनाम झाला आहे. पाथर्डीत जिल्ह्याबाहेरील शेकडो मुले दहावी, बारावीची परीक्षा देतात. वर्षभर शाळा, कॉलेज न येता ही मुले थेट परीक्षेलाच येतात. परीक्षेच्यावेळी शहरातील बहुतांश लॉज भरलेले असतात. मुलांना विविध शाळांत प्रवेश देणे, त्यांना कॉप्या पुरवून उत्तीर्ण करणे हा एकप्रकारे येथे उद्योगच बनला आहे. त्याचे मोठे रॅकेटच कार्यरत आहे.
‘लोकमत’ने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील किती मुलांनी पाथर्डीत प्रवेश घेतलेला आहे, याची चौकशी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरील मुले आमच्याकडे नाहीत, असे हमीपत्र चौकशी समितीला देऊन काही शाळा आपला बचाव करत आहेत. शाळांचे सर्व दप्तर तपासल्यानंतर राज्यातील कॉपी रॅकेटचा प्रकार समोर येईल. परगावच्या एवढ्या मुलांना प्रवेश कसे मिळाले व परीक्षा मंडळानेही मुलांना येथे परीक्षा देण्यास परवानगी कशी दिली?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
आता पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार सुरू
गुरुवारी भूमितीच्या पेपरला प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या पथकाने विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन बारा विद्यार्थ्यांवर कारवाई केली. परंतु भरारी पथक जाताच पुन्हा खुलेआम कॉपी सुरु झाली. कॉपी रोखण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार यांची पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, त्यांना कोणी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कॉपीबहाद्दरांचा अटकाव शिक्षण विभाग करु शकतो. मात्र, शिक्षण विभाग त्यात टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे आता पत्रकारांनाही धमकावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.
कॉपीप्रकरणाची समिती चौकशी करीत असल्यामुळे कोणत्या शाळांमध्ये जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी आहेत, याबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीच माहिती देता येणार नाही.
- लक्ष्मण पोले, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी