खुली चर्चा : मुलींना मोबाइल बंदी समर्थनीय आहे का? जाणा वाचकांची मते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 08:22 AM2019-07-20T08:22:56+5:302019-07-20T08:24:01+5:30
गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.
गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. तिच्याजवळ मोबाईल आढळल्य़ास वडिलांकडून तब्बल दीड लाखांचा दंड उकळला जाणार आहे. तसेच कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करण्यावरही बंधने लादण्यात आली आहेत. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.
अभ्य़ासासाठी मोबाईल फायद्याचा
मोबाईल हा काळाची गरज आहे. मला वाटते मोबाईल जर चांगल्या कामांसाठी वापरलं गेला तर त्यात चुकीचे काही नाही. कारण शिक्षण घेत असणार्या मुली अभ्यासाची सविस्तर माहिती मोबाईलवर पाहत असतात. माझ्या मते प्रत्येक आई वडिलांनी मुलींचा मोबाईल वेळोवेळी तपासायला हवा.त्यामुळे मुली वाईट मार्गावर जाणार नाहीत. अविवाहित मुलींना मोबाईल बंदी हे चुकीचे आहे.
- गायत्री पाटील. (महाविद्यालयीन विद्यार्थिनी)
मुलांवरही बंदी हवी
फक्त मुलींनाच मोबाईल वापरावर बंदी नको तर महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या सर्वच मुलांवरही बंदी असावी. शालेय जीवनात मोबाईलची गरज नाही. मोबाईलचा वापर अभ्यासासाठी होत नसून वेळ वाया घालवण्यासाठीच केला जातो. अतिवापरामुळे मुलं घडत नाहीत तर ती बिघडत चालली आहेत. पालकांनी-दहा हजार मोबाईलवर खर्च करण्यापेक्षा त्याच्या शिक्षणावर खर्च करावेत.
- गिरी राजगुरु प्रल्हाद.(प्रा.शिक्षक)
समाज युवा वर्गाची प्रगती रोखतोय
युवा वर्गाला अभ्यासक्रमातील विविध बाबी समजून घेण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान सहाय्यक ठरते. कोणत्याही क्षेत्रात मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, शिक्षकी पेशा असो किंवा कोणतेही क्षेत्र तुम्ही निवडले असेल तरी या सर्व क्षेत्रात कार्य करण्यासाठीच प्रगल्भ ज्ञान मिळवण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञान सहाय्यक ठरते. जर एखादा समाज जाणीवपूर्वक या तंत्रज्ञानापासून युवा वर्गाला दूर ठेवत असेल तर तो समाज युवा वर्गाची प्रगती आजच रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अविवाहित मुली व महिलांना मोबाईल वापर बंदी करणे योग्य नाही.
- शरदचंद्र हिंगे
मुलांकडूनच मोबाईलचा गैरवापर अधिक
मोबाईल हे घडामोडी जाणून घेण्याचे, बाहेरच्या जगाशी संपर्काचे महत्त्वाचे साधन तर आहेच, पण सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. मुलींकडे मोबाइल नकोच, अशी बंधने मुले वा पुरुषांवर का लादत नाहीत? खरे तर मोबाइलचा गैरवापर पुरुष, मुलेच अधिक करताना दिसतात. म्हणून पुरुषांना मोबाइल कशाला हवाय वा त्यांच्या मोबाइल वापरण्यावर बंदी आणावी, असे महिला म्हणत नाहीत. नारीशक्तीचा जागर सुरू असतानाच अब्रू, इज्जत यांच्या नावाखाली मुली-महिलांवरच कठोर बंधने टाकण्याचे तालिबानी प्रयत्नही राजरोस सुरू आहेत.१८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला घटनेने जे स्वातंत्र्य दिले आहे, त्याच्याआड येणे चुकीचे आहे.
- योगेश प्रल्हाद जिरेकर
मग मुलांना अभ्यासाची गरज नाहीय का?
जात, धर्म व लिंग असा भेद करून एखाद्या घटकावर काहीही बंदी घालणे चुकीचे आहे व तसेच ते असंविधानिक कृत्य आहे. मोबाईल वापराची बंदी मुलींनाच का करावी? मोबाईलच्या वापरावर बंदी घातली तर मुलींचा अभ्यास चांगला होईल याचा अर्थ मुलांना अभ्यासाची गरज नाही का? तंत्रज्ञानाच्या युगात त्याचा वापर न करणे म्हणजे काळाच्या मागे राहणे असेच आहे. प्रत्येकाने काळासोबत चालायला हवं. स्त्री आणि पुरुष असे दोघेही मिळून संसार चालतो त्यामुळे कमी अधिक पणाची भावना एकमेकांबद्दल असू नये.
- डॉ. धर्माजी खरात