बनावट बँक खाती उघडून करोडोंचे चेक वटवणारी टोळी गजाआड
By admin | Published: August 27, 2014 04:42 AM2014-08-27T04:42:51+5:302014-08-27T04:42:51+5:30
कुरिअरच्या माध्यमातून आलेले चेक लंपास करून बनावट बँक खात्यात वटवणाऱ्या ५ जणांच्या टोळीला माटुंगा पोलिसांनी गजाआड केले
मुंबई : कुरिअरच्या माध्यमातून आलेले चेक लंपास करून बनावट बँक खात्यात वटवणाऱ्या ५ जणांच्या टोळीला माटुंगा पोलिसांनी गजाआड केले. या आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि करोडो रुपयांचे चेक देखील हस्तगत केले आहेत.
मुलुंड येथे राहणारे प्रशांत पटेल यांचा रंग विकण्याच्या व्यवसाय आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याांनी खोपोलीतील भूषण स्टील या कंपनीला माल पाठवला होता. त्यानुसार कंपनीने त्यांना २२ लाखांचा चेक कुरिअरच्या माध्यमातून पाठवला. मात्र, कंपनीने चेक पाठवून महिना उलटला असताना त्यांना चेक न मिळाल्याने त्यांनी याबाबत कंपनीकडे अधिक चौकशी केली. यामध्ये त्यांचा चेक खात्यात वटल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार त्यांनी बँकेशी संपर्क साधला असता मुलुंडमधील त्यांच्या खात्यात हा चेक जमाच झाला नसून तो माटुंग्याच्या एका बँकेत जमा झाल्याचे त्यांना समजले. आपला चेक कोणीतरी चोरुन वटवल्याचे लक्षात येताच पटेल यांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिगत सांगितली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस नाईक गावीत, चव्हाण आणि सोनावणे यांनी बँकेत जाऊन ज्या खात्यात चेक वटवण्यात आला त्याचा शोध घेतला. मात्र, यामध्ये सर्व कागदपत्र बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अखेर पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई येथून सुनील कुवार (२७) आणि रघुत्तम नामण्णा (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता यातील मुख्य सूत्रधार लक्ष्मण जोगळेकर (४२) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याच दिवशी त्याला देखील ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बीकॉम पास असलेल्या लक्ष्मणची काही वर्षांपूर्वी कुरिअर कंपनी होती. त्यामुळे त्याला कुरिअरबाबत सर्व काही माहित होते. अनेक कंपन्या कुरिअरच्या माध्यमातून चेक पाठवत असल्याने हेच चेक चोरुन ते वटवण्याची कल्पना त्याने आखली. यासाठी त्याने एक प्लेसमेंट एजन्सी सुरु केली. यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या मुलांच्या नावाने तो बनावट खाती उघडत होता. शिवाय त्याच्याकडेच काम करणाऱ्या रोहित गायकवाड (२३) या तरुणाला त्याने ओळखीवरुन एका मोठ्या कुरिअर कंपनीत कामाला लावले. हा तरुण कुरिअरसाठी आलेले चेक आरोपीकडे आणून द्यायचा. त्यानंतर लक्ष्मण मंजूनाथ घोडके (२३) याच्या मदतीने त्या चेकवर असणाऱ्या कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून ते चेक वटवायचा. अशाप्रकारे या आरोपीने अतापर्यंत करोडो रुपयांचे चेक वटवले असून त्याच्याकडून पोलिसांनी १८९ विविध कंपन्याचे चोरलेले चेक, बनावट पॅनकार्ड, एटीएम कार्ड, १६ मोबाईल फोन आणि साडेपाच लाख रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याअधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)