ओपन जिम रातोरात गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:53 AM2017-07-28T00:53:14+5:302017-07-28T00:53:25+5:30
कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झाली.
ठाणे : कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झाली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आले होते. मात्र, आमदार निधी खर्च झाल्यावर ओपन जिम बंद करून येथील रस्ता आम्ही तयारच केला नसल्याचा दावा पालिकेने केला, पण याच ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या नावाखाली तब्बल ५५ लाखांचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानाने केला. त्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ती मिळाली नाही.
या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतदेखील याची चौकशी करण्याची मागणी अभियानाने केली आहे. या प्रकरणात शिंदे यांच्यासह ठाणे पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयही दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील पुरावेच सादर केले. कांदळवनात अतिक्रमण करून पालिकेने आमदार निधीतून अण्णाभाऊ साठे उद्यान विकसित केले. त्यावर १० लाखांचा खर्च करण्यात आला. ओपन जिम विकसित करण्यात आली. त्यातील साहित्याचा खर्च ४ लाख ३१ हजारांच्या घरात गेल्याची माहिती अभियानाचे रोहित जोशी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. कोपरी पोलीस ठाण्यात पालिकेविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
यानंतरही पालिकेने आमदार निधीतून उद्यानाच्या सुशोभीकरणावर ५८.१९ लाखाच्या खर्चाला मंजुरी दिली. त्यामुळे अभियानाचे संजीव साने यांनी चौकशीची मागणी केली आहे.