उजनी धरणातील उघडी पुरातन मंदिरे पुन्हा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:50 PM2019-08-06T14:50:24+5:302019-08-06T14:53:40+5:30
उजनी भरले ९३ टक्के; ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप
करमाळा : तब्बल चार महिने मृत साठ्यात असलेले उजनी धरण गत सप्ताहात उपयुक्त पाणीसाठ्यात आल्याने पाण्याबाहेर उघडे पडलेले पुरातन पळसदेवाचे मंदिर, इनामदाराचा वाडा, ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप झाले आहेत.
गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले, पण सर्वदूर कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वारंवार सोडण्यात आल्याने यंदा उजनी धरणातील पाणीपातळी वजा ५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. उजनी धरण निर्मितीवेळी तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कुगाव, कंदर, पारेवाडी, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कात्रज, खातगाव या गावांचे पुनर्वसन झाले. दरम्यान, उठलेल्या गावातील पुरातन अवशेष त्यावेळी पाण्यात गडप झाले.
उजनी धरणातील पाणी यंदा एप्रिलमध्ये मृतपातळीमध्ये गेले. यामुळे पाण्यात लपलेली पुरातन अवशेष बाहेर डोकावू लागली. त्यामध्ये कुगावच्या जुन्या गावठाणातील इनामदारांच्या वाड्याचा समावेश होता. या इनामदारांच्या वाड्यात तरुणाईला वेड लावणाºया नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होते.
पुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात व त्यानंतर तीन दिवसांत पुणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने पुणे भागातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येऊन धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. गेल्या चार दिवसांत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली आहेत.
उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने व धरणात श्ांभर टक्के पाणीसाठा होणार असल्याने पुनर्वसित शेतकºयांतून आनंद व्यक्त होत असून, धरण व नदीपात्रात पाणी वाढल्याने पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेऊ लागले आहेत.
प्रा. शिवाजीराव बंडगर,
अध्यक्ष, उजनी धरण
पुनर्वसन संघर्ष समिती