अकोल्यात पासपोर्ट कार्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा
By Admin | Published: May 30, 2017 02:22 AM2017-05-30T02:22:31+5:302017-05-30T02:22:31+5:30
गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या प्रयत्नाला यश : विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पासपोर्ट (पारपत्र) काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हे कार्यालय अकोल्यातच पाहिजे, यासाठी सन २०१५ मध्ये एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गृहविभागाचे अतिरिक्त सचिव यांना सूचना करीत सर्व तांत्रिक अडचणी दूर करू न हा प्रस्ताव मंजूर करू न घेतला आहे यामुळे अकोल्यात पासपोर्ट कार्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा झालाआहे
व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आदी कामांसाठी विदेशात जाणाऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या अडचणीच्या प्रक्रियेतून जावे लागत होते. त्यामुळे पासपोर्ट काढून देण्याऱ्या दलालांची एक साखळीच तयार झाली होती. त्यामुळे नागरीकांच्या सोयीसाठी हे नोंदणी कार्यालय अकोल्यातच असावे, यासाठी डॉ. पाटील यांनी जिल्ह्याच्या प्रशासनाला यासंदर्भातील एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सन २०१५ मध्ये एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पासपोर्ट नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत असावी, असा उल्लेख आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी त्यावेळी १ कोटी १८ लाख ३१ हजार रुपये एवढा खर्च दाखविण्यात आला होता. दरम्यान, या प्रस्तावाला काही तांत्रिक कारणांमुळे मंजुरी मिळत नव्हती. अखेर डॉ. पाटील यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रस्तावाला वाढीव रक्कम मंजूर करू न मान्यता प्रदान करण्यात आली.
सुधारित प्रस्तावात पासपोर्ट इमारत बांधकामासाठी १ कोटी २५ लक्ष मंजूर करू न लवकरच या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. स्वतंत्र इमारत व स्वतंत्र आस्थापन असल्यामुळे आता अकोलेकरांना पासपोर्ट काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कार्यालयात एकाच छताखाली चरित्र पडताळणीसह सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता मिळाली असून, तसा लेखी आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.
पासपोर्ट कार्यालय अकोल्यातच झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जाताना पासपोर्ट काढण्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. पासपोर्टची प्रक्रिया सोपी होईल. या कार्यालयाच्या निर्मितीसाठी येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होणार आहे.
- डॉ. रणजित पाटील
गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला