मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वायुनंदन
By admin | Published: March 6, 2017 07:29 PM2017-03-06T19:29:37+5:302017-03-06T19:29:37+5:30
बुधवारी पदभार स्वीकारणार ;दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. वायुनंदन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. कुलगुरूपदासाठी विक्रमी अर्ज आल्याने या निवडीकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले होते. बुधवारी वायुनंदन पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. माणिकराव साळुंखेयांनी १९ आॅगस्ट २०१६ मध्ये मुदतीपूर्वीच कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्याने कुलगुरूपद रिक्त होते. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपासून नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. वायुनंदन यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए.एम.फील तसेच पीएचडी प्राप्त केली असून, उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.
कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. मोहीम शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली होती. दिल्लीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अजयकुमार शर्मा तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.