विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका
By admin | Published: January 7, 2017 01:28 AM2017-01-07T01:28:13+5:302017-01-07T01:28:13+5:30
महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध विकास प्रकल्पांची उद्घाटने व कार्यक्रमांच्या आयोजनाचा धडाका सुरू आहे.
महापालिका निवडणूक अवघ्या सव्वा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व महोत्सवाचे कार्यक्रम तातडीने घेतले जात आहेत. सध्या अनेक विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, नेत्यांची वेळ मिळणे अडचणीचे झाले आहे. अनेक कामे पूर्ण झालेली असतानाही निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांना आचारसंहिता लागू होण्याची धास्ती आहे.
यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना इच्छुकांना पायपीट करावी लागणार आहे. अधिकाधिक मतदारांंपर्यंत पोहोचता यावे यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमांचे
आयोजन केले जात आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्चही केला जात आहे. प्रत्यक्षरीत्या भेटता येत नसले, तरी अनेकांनी मोठ्या कार्यक्रमांतून निवडणुकीबाबत इच्छुकता स्पष्ट केली आहे. (प्रतिनिधी)
नेत्यांची मिळेना वेळ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक प्रभागातील नगरसेवक रस्ते व विकासप्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटनांचे कार्यक्रम घेताना दिसत आहे. शिवाय इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. नेत्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी प्रभागात निमंत्रित केले जाते. परंतु, प्रत्येक राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची वेळ कार्यक्रमांसाठी मिळविणे जिकरीचे झाले आहे.
>कार्यक्रमांची रेलचेल...
मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह विविध स्पर्धा, साहित्यवाटप केले जात आहे. यासह मतदारांसाठी दूरदूरच्या सहलींचेही आयोजन केले जात आहे. यासह विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यावरही भर दिला जात आहे. तर इतर इच्छुकांनी साहित्य वाटपासह मतदारांसाठी छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आचारसंहिता काळात असे कार्यक्रम आयोजन करण्यावर मर्यादा येतात. निवडणूक खर्चातही त्याचा समावेश केला जातो. यामुळे इच्छुकांनी आताच कार्यक्रमांचा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.