एकनाथ खडसे यांचा दुटप्पीपणा उघड
By admin | Published: May 11, 2014 11:10 PM2014-05-11T23:10:48+5:302014-05-12T04:05:58+5:30
घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
घरकूल प्रकरण : रमेशदादांचे आव्हान स्वीकारणार काय?
जळगाव : घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
घरकूल प्रकरणात खडसे यांनी नेहमीच एकतर्फी आणि पक्षपाती भूमिका घेतल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. सुरेशदादा जैन यांचा द्वेष हेच त्यामागील कारण आहे. जैन यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणा, सत्ताधारी पक्ष यांच्यावर दबाव आणून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. भ्रष्टाचाराविरुध्द लढाईचा दावा जरी खडसे करीत असले तरी त्यात तथ्य नाही, हे त्यांच्या भूमिकेतून वारंवार दिसून आले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जळगावात देवकरांच्या हामुळे सहा वर्षापूर्वीचे प्रकरण उकरुन काढल्याचा गौप्यस्फोट केला. त्याच्या दुसर्याच दिवशी खडसे यांनी फैजपूरच्या सभेत देवकरांना मीच तसे सूचविले होते, असे वक्तव्य करीत या कामगिरीचे पितृत्व स्वत:कडे घेतले. देवकर या प्रकरणातील एक आरोपी असून सध्या कारागृहात आहेत. भ्रष्टाचाराविरुध्द लढाईची तुतारी फुंकणार्या खडसे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या देवकर यांची मदत घेतली, हे त्यांच्याच वक्तव्यातून उघड झाले. व्यक्तीद्वेषापोटी तत्त्वाला तिलांजली दिल्याचा हा प्रकार जळगावकरांना नवीन नाही.
देवकरांसारख्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यावर दबाब आणणार्या खडसे यांनी पोलीस दलाला नेहमी दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. तपासाधिकारी इशू सिंधू ऐकत होते, म्हणून ते चांगले आणि पोलीस अधीक्षक जयकुमार ऐकत नाही, म्हणून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची खडसे यांची दुटप्पी भूमिका पुन्हा उघड झाली. जयकुमार यांनी अहवालात सूर्यवंशी यांच्या आजाराविषयी उल्लेख करुनही खडसे तसा उल्लेख नसल्याचे धडधडीत खोटे बोलत आहेत.
स्वार्थासाठी मानभावीपणा
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची प्रचार फलके, पत्रके, जाहिरातींमध्ये सुरेशदादा जैन यांचे छायाचित्र खडसे यांनी ठळकपणे घेतले. शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांचे छायाचित्र घेत असताना त्याच सेनेच्या पक्षप्रमुखांनी सुरेशदादा जैन यांच्यावर राजकीयदृष्टया अन्याय होत असल्याची भूमिका जाहीरपणे घेतल्याकडे कानाडोळा केला. हा मानभावीपणा खडसे हे स्वार्थासाठी करीत आहेत, हे स्पष्ट आहे.
आव्हानाकडे लक्ष
खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी खडसे यांना आरोप सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे. ते आव्हान आता खडसे स्वीकारतात काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)