उमलण्याआधीच खुडल्या ‘कोवळ्या कळ्या’
By admin | Published: October 3, 2016 01:39 AM2016-10-03T01:39:04+5:302016-10-03T01:39:04+5:30
शारीरिक आणि मानसिक बदलाच्या कालावधीत पालकांशी संवाद तुटल्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत
सायली जोशी-पटवर्धन/ राहुल शिंदे,
पुणे- किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाच्या कालावधीत पालकांशी संवाद तुटल्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत; तसेच वाढत्या वयात भुलविणारे प्रसंग, प्रेमाचे आकर्षण, स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक, कौटुंबिक दबावामुळे ‘कोवळ्या कळ्या’ उमलण्याआधीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारून स्वत:ला चुरगाळून टाकत आहेत. त्यामुळे जग समजण्याआधीच, जग सोडण्याच्या निर्णयाप्रत जाणाऱ्या मुला-मुलींना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वी समाजातील सर्व घटकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात प्रेमभंग आणि घरच्यांना प्रेम संबंधाची माहिती समजेल, या भीतीने तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. सुमारे महिनाभरापूर्वी दोन शालेय विद्यार्थिनींनीसुद्धा स्वत:चे हात बांधून नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांमुळे सामाजिक, शैक्षणिकक्षेत्रात एकच खळबळ उडाली. शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनांकडे सामाजिक, शैक्षणिक व मानसिक आरोग्याचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपाडे, रझिया पटेल, समुपदेशक सुलोचना हर्षे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर, डॉ. वासुदेव परळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना या मागची कारणे आणि किशोरवयीन मुलांची बदलत असलेली मानसिकता यांचा आढावा घेतला; तसेच केवळ समाजानेच नाही, तर शासनानेही या घटनांकडे गांभीर्याने पाहून त्यावर धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी भूमिका शिक्षण तज्ज्ञांनी मांडली.
वसंत काळपांडे म्हणाले, ‘प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेमविषयक भावनांची माहिती प्राप्त होते. मुलांच्या तारुण्याबद्दल असणाऱ्या संकल्पना आणि पालकांचा विचार याबाबत मोठी तफावत आहे. किशोरवयात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल, त्याचवेळी वाढती स्पर्धा आणि आयुष्याच्या बदलत असलेल्या संकल्पना यांचा मेळ घालणे विद्यार्थ्यांना अनेकदा कठीण होत आहे.
सुरुवातीपासूनच संस्कृतीच्या नावाखाली समाजाने लैंगिक शिक्षणाला विरोध केला. मात्र, डॉक्टर, समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला हवे. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर समुपदेशन करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी घरात व घराबाहेर काय करतात, याकडे लक्ष द्यायला हवे,’ असेही काळपांडे म्हणाले.
समुपदेशक सुलोचना हर्षे म्हणाल्या, ‘किशोरवयीन मुलांमध्ये अनेकदा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे, असा अट्टहास असतो. तसे न झाल्यास येणाऱ्या रागातून कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे, या एकाच उद्देशाने आत्महत्या केली जाते. ही शिक्षा स्वत:ला करणे म्हणजेच आत्महत्या.’
>हे करणे आवश्यक
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला गुन्हेगार समजू नका.
स्वत:ला पुरेसा वेळ द्या, स्वत:वर प्रेम करा.
भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका.
जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवा. मन मोकळे करा.
>भारतीय समाज हा मुळातच भावनाप्रधान असल्याने मुलांमध्ये भावनेच्या भरात वाहून जाण्यामुळे आत्महत्येच्या प्रसंगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; मात्र भावनांवर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळविण्याची शक्ती या तरुणांमध्ये नसल्याने आत्महत्या हा टोकाचा मार्ग ते स्वीकारताना दिसतात. किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमप्रकरण, करियरची चिंता, व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणांमध्ये स्वाभिमान आणि पराभव एकत्र आल्याने मुला-मुलींकडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असून, सामाजिक, सांस्कृतिक, नातेसंबंध, तत्कालीन किंवा दीर्घकालीन राग आणि भ्रमनिरास अशी कारणे असू शकतात. प्रत्येक आत्महत्या टाळता येत नाही; मात्र समुपदेशन, योग्य पद्धतीने संवाद याने हे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते; तसेच आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनंतर मागे राहणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ला दोषी धरू नये. समाजानेही आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, प्रेमप्रकरणातील जोडीदार इत्यादींना दूषणे न देता त्यांचा समाजाने योग्य पद्धतीने स्वीकार करावा.
डॉ. वासुदेव परळीकर,
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ
>किशोरवयीन मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशभर विविध योजना व उपक्रम राबविणे शक्य होईल. प्रेम केल्याचे घरी कळेल, या भीतीने लहान मुलांनी आत्महत्या करणे, ही भयंकर गोष्ट आहे. प्रेम म्हणजे नेमके काय? याबाबत पालकांनी घरात व शाळांमध्ये शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे. त्यातून अशा घटना थांंबविता येतील.
- रझिया पटेल, शिक्षण तज्ज्ञ
>एका घटनेवरून जीवनाला
नापास करू नका
प्रेमभंग, करियरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने आलेली निराशा, स्वत:बद्दल असणाऱ्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न होणे अशा आयुष्याच्या टप्प्यावरील एखाद्या घटनेवरून जीवनाला नापास करणे अतिशय चुकीचे आहे.
>आत्महत्या हा पर्याय नाही
मागील १० दिवसांत पुण्यातील आयुर्वेदाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुलींनी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या कारणांवरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनींच्या स्वत:कडून असणाऱ्या अपेक्षा, नापासांविषयी समाजाचा असणारा दृष्टिकोन, पालकांशी या विद्यार्थिनींचे असणारे नाते ही अशाप्रकारच्या शैक्षणिक अपयशाने केलेल्या आत्महत्यांमागील मुख्य कारणे असू शकतात.
>म्हणून होतात आत्महत्या...
जीवनाच्या संकल्पना आणि सत्यता यातील तफावत
कोवळ्या वयात प्रगल्भता नसल्याने तडकाफडकी निर्णय घेणे
कुटुंबात न रमता बाहेरील गोष्टींमध्ये रमण्याच्या प्रमाणातील वाढ
प्रसारमाध्यमांचा सर्व स्तरातून सातत्याने होणारा आघात
कुटुंबातील व्यक्तींकडून सातत्याने येणारा दबाव
पालकांनी मुलांच्या अपेक्षा, वाढीतील बदल समजून न घेणे
मुलींना हवी असणारी नको इतकी स्वायतत्ता