ग्रीन रिफायनरीबाबतचा शिवसेनेचा खरा चेहरा उघड करणार- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 09:46 PM2018-01-16T21:46:04+5:302018-01-16T21:46:39+5:30
सत्तेत असणा-या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पीच आहे.
मालवण : सत्तेत असणा-या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पीच आहे. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा नाणारमध्ये जाऊन जनतेसमोर उघडा करणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला. मालवण येथील नीलरत्न या निवासस्थानी आले असता त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
नारायण राणे म्हणाले, नाणारमध्ये आजपर्यंत अनेक बडीबडी नेतेमंडळी आली आहेत. त्यांनी आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे सांगितले आहे. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान कोणते? कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले? कोणते प्रकल्प त्यांनी याभागात आणले? असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.
सत्तेत असणारे उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असताना शिवसेनेला नाणारला का जावे लागते? उद्योगमंत्र्यांनीच तो प्रकल्प रद्द करून दाखवावा. ग्रीन रिफायनरील आमचा विरोधच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारला जाऊन शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असेही राणे म्हणाले.
ग्रीन रिफायनरीमध्ये सेनेचे दलाल
शिवसेनेची कोकणाबाबत दुटप्पी भूमिका राहिली आहे. यापूर्वी एनरॉन, जैतापूर यांनाही विरोध केला होता. आता नाणारलाही आपला विरोध असल्याचे दाखवत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ग्रीन रिफायनरीमध्ये जे लोक आहेत ते शिवसेनेचे दलाल आहेत.