Prasad Lad on Eknath Shinde Shivsena | Operation Lotus सुरू झालंय का? भाजपाचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:22 PM2022-06-21T13:22:32+5:302022-06-21T13:36:30+5:30
भाजपाच्या प्रसाद लाड यांनी काँग्रेस उमेदावाराचा केला पराभव
Prasad Lad on Eknath Shinde Shivsena: राज्यसभेच्या निवडणुकी पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पराभव झाला. भाजपाची सत्ता नसतानाही त्यांनी त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरत असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. सुमारे २५-३० आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरत येथे निघून गेले आणि नॉट रिचेबल झाले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपाला साथ देणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्याबाबत, 'ऑपरेशन लोटस सुरू झालं आहे का', असा सवाल विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अतिशय संतुलित उत्तर दिले.
" शिवसेनेमध्ये नक्की काय सुरू आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. पुढे काय होतंय पाहूया. आम्हालाही न्यूज आणि मीडियामधूनच या गोष्टी समजत आहोत. आम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत. खरं पाहता शिवसेना अजूनही दावा करते की त्यांची ३ मते फुटली आणि पराभव अपक्षांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरं तर शिवसेनेची १२ मते फुटली आहेत. कोण-कोण फुटले अशी नावं सांगू शकत नाही, पण हा शिवसेनेला मोठा धक्का आहे", असे सूचक विधान भाजपाचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांनी केले.
"एकनाथ शिंदे जर काही प्रस्ताव ठेवला तर पुढे काय याबाबत बोलण्याइतका मी मोठा नाही. भाजपाचे बडे नेते आणि केंद्रातील नेतृत्व या संदर्भात बोलेल आणि निर्णय घेईल. शिवसेनेच्या सर्वच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. पण या बाबतीत त्यांच्या पक्षात काय चाललंय हे आम्हाला आता तरी माहिती नाही. शिवसेनेत नक्की काय घडतंय याची आपल्याला थेट कल्पना नाही", असेही प्रसाद लाड म्हणाले.