भाड्याच्या इमारतींमधून चालतो ‘आरटीओ’चा कारभार
By admin | Published: August 7, 2014 09:00 PM2014-08-07T21:00:56+5:302014-08-07T22:56:26+5:30
अनेक जिल्ह्यांमध्ये स्वमालकीची इमारत नाही
वाशिम: अकोला, वाशिमसह बीड, हिंगोली, अंबेजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे कामकाज वर्षानुवर्षापासून भाड्याच्या इमारतींमध्येच सुरू आहे. स्वमालकीची इमारत आणि जागा नसल्याने दैनंदिन कामकाज करणे, परिवहन अधिकार्यांसाठी कठिण झाले आहे.
वाहन चालविण्याचा परवाना देण्याबरोबरच विविध प्रकारच्या चाचण्या घेणे, वाहतुकीचेनियम पायदळी तुडविणार्यांकडून दंड वसूल करणे आदी जबाबदार्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागावर आहेत. चालकांना परवाना देण्यासाठी तसेच वाहनांची चाचणी घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयास स्वतंत्र कार्यालय आणि पुरेशी जागा असणे आवश्यक असते; मात्र अद्यापही राज्यातील अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना स्वतंत्र इमारत नाही. अकोला, वाशिम, हिंगोली, बीड, अंबेजोगाई आदी जिल्ह्यांमध्ये सारखीच परिस्थिती आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने नानाविध असुविधांचा फटका अधिकारी-कर्मचार्यांसह कामानिमित्त येणार्या वाहनधारकांनाही बसत आहे. याशिवाय स्वमालकीची इमारत नसल्याने भाड्याचा भुर्दंडही शासनाला सोसावा लागत आहे. जिल्हा कार्यालयांसाठी स्वमालकीच्या इमारतींबाबत परिवहन मंत्र्यांनी गत आठवड्यात मुंबई येथे वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हा कार्यालयांच्या प्रश्नावर तपशीलवार चर्चा झाली. यातून हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचार्यांकडून व्यक्त होत आहे.
** रेकॉर्ड सांभाळणे अवघड!
वाशिम, अकोला, हिंगोली, बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या इमारती जुन्या आहेत. पावसाळ्यात या इमारती गळतात. अशा स्थितीत कार्यालयीन दस्तावेज सांभाळताना कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते.