भिवंडीतील वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ; पहिल्या दिवशी वाहन चालकांचा उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:47 PM2021-08-25T19:47:03+5:302021-08-25T19:50:55+5:30
भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून भिवंडीत वाहतूक विभागाच्या वतीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून भिवंडीत वाहतूक विभागाच्या वतीने बुधवारी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. भिवंडी शहराच्या महापौर प्रतिभा पाटील त्यांच्या शुभहस्ते बुधवारी सायंकाळी जकात नाका येथील धर्मवीर चौकाशेजारी या सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला.
या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून भिवंडीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वाहन चालकांना सिग्नलचे पालन करण्याची सवयनसल्याची प्रचिती सिग्नल यंत्रणेच्या उदघाटनानंतर धर्मवीर चौकात दिसली. अनेक वर्षांपासून बंद असलेली सिग्नल यंत्रणा अचानक सुरु झाल्याने वाहन चालकांचा प्रचंड गोंधळ उडाला होता. लाल सिग्नल लागला असतांनाही वाहन चालक रस्त्यावरून गाड्या नेत असल्याने धर्मवीर चौकात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर वाहतूक पोलीस व ट्राफिक वार्डनच्या वतीने सिग्नल यंत्रणा सुरु झाल्याची माहिती वाहन चालकांना देण्यात येत होती. व हळूहळू वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते.
दरम्यान शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून निश्चितच सुटका होईल असा विश्वास महापौर प्रतिभा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तर नागरिकांसह वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व सिग्नल पाहूनच प्रवास करावा तसेच चौका चौकात रस्ता अडवून राहणाऱ्या रिक्षा चालकांनी देखील मुख्य नाक्यावर वाहतुक कोंडी होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी यावेळी नागरिकांसह रिक्षा व वाहन चालकांना केले आहे.