कर्जमाफीवर विरोधक आग्रही

By admin | Published: December 17, 2015 02:49 AM2015-12-17T02:49:49+5:302015-12-17T02:49:49+5:30

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी

Opponent advocates on debt relief | कर्जमाफीवर विरोधक आग्रही

कर्जमाफीवर विरोधक आग्रही

Next

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधी व सत्तापक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी हेमंत टकले यांनी केली. सावकाराकडील कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना काय मिळाले. आत्महत्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. पिकाची पैसेवारी काढण्याची पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी प्रा.जोगेद्र कवाडे यांनी केली.
बीड जिल्ह्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांत आत्महत्येची मानसिकता का निर्माण झाली, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे मत विनायक मेटे यांनी मांडले. राज्यात सर्वात कमी पाऊ स पश्चिम महाराष्ट्रात पडतो. साखर कारखाने बंद पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडणार असून राज्याच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची मानसिकता बदलावी, असे मत रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. राज्यातील युती सरकार लबाडाचं आहे. आजवर या सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. सावकाराच्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड यांनी केला.
शेतकऱ्यांचे हिताच्या योजना राबविताना अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या फाईल सरकारी कार्यालयातून गहाळ होत असल्याचा आरोप ख्वाजा बेग यांनी केला. शेतकरी संघटित नसल्याने त्याची सतत अहवेलना केली जाते. बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे कर्ज घेण्याची तयारी होते. परंतु शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीच मिळत नसल्याचा आरोप डॉ. सुनील तांबे यांनी केला.
टोल, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. प्रकाश गजभिये म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत्रा, सोयाबीन, कापूस व धानाला भाव नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भातील असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी मत मांडले.
नागो गाणार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार, सोयाबीनला पाच हजार तर धानाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केली. बुलेट टे्रनसाठी कर्ज घेतले जाते. असेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज घ्यावे, असे मत रामराव वडकुते यांनी मांडले. (प्रतिनिधी)

Web Title: Opponent advocates on debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.