विरोधक पळपुटे, गोंधळालाच प्राधान्य
By Admin | Published: December 24, 2015 02:24 AM2015-12-24T02:24:39+5:302015-12-24T02:24:39+5:30
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले.
नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची व उत्तराला थांबायचे नाही, असे पळपुटेपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले होते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालविला. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व उत्तराच्या वेळी गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. परंतु सत्तापक्षाने सकारात्मक भूमिका घेतली. अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाच मंत्र्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी हवे तर जनहित याचिका दाखल करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या चार वर्षांत नापिकी असल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय देखील घेण्यात आले. विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते. परंतु मागील ७ हजार कोटींच्या कर्जमाफीत विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. याचा लाभ प्रामुख्याने बँकांना झाला. ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांसाठी १०५१२ कोटींचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातून दुष्काळाने बाधित १५७४७ गावांतील शेतकऱ्यांना मदत, ५३ लाख १९ हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात ७४१२ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर जे विदर्भाला मिळाले नाही ते मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रपरिषदेला महसूलमंत्री एकनाथ खडसे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहन
मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री
डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)