विरोधक प्रभावशून्य
By admin | Published: July 25, 2015 01:36 AM2015-07-25T01:36:00+5:302015-07-25T01:36:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. अजित पवार व छगन भुजबळ सोडले तर विरोधकांची भाषणे प्रभावशून्य असल्याचा घरचा अहेरही राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र यापूर्वीची कर्जमाफी ही भाजपाच्या मागणीनुसार झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राचे महत्त्व कमी करत असताना फडणवीस मूग गिळून बसले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून, आठ महिन्यांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.
उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे केवळ लोकांची करमणूक होत असल्याचा टोला लगावून राणे म्हणाले की, भाजपा उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत आहे. भाजपाने ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांना बगल देऊनही लाचारीने ते सत्तेत बसले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते सत्तेत राहिले नसते. रामदास कदम यांनी पर्यावरण या शब्दाचा अचूक अर्थ सांगितला तर मी वाट्टेल ते हरेन, असा चिमटा राणे यांनी त्यांना काढला. (विशेष प्रतिनिधी)