सरकारच्या मदतीला विरोधक धावले! मेहतांच्या गैरव्यवहारावर गुपचिळी; तावडेंच्या मदतीला राणे आलू धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 05:05 AM2017-08-02T05:05:31+5:302017-08-02T05:06:59+5:30
मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेणा-या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी काल सोडून दिलेली असतानाच, आज शिक्षणमंत्री मंत्री विनोद तावडे यांच्यावर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.
अतुल कुलकर्णी ।
मुंबई : मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेणा-या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी काल सोडून दिलेली असतानाच, आज शिक्षणमंत्री मंत्री विनोद तावडे यांच्यावर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.
पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यापेक्षा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचेच काम विरोधी पक्ष करताना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी विरोधकांनी सोडून दिली, शेतकºयांच्या पीक विम्यावरुन सरकारची कोंडी करता आली नाही. तर मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस राष्टÑवादीने मांडू दिला नाही. विशेष म्हणजे, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी निर्णय राखून ठेवत भाजपाला मदत करण्याचीच भूमिका घेतली.
मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या निकालावरून शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत शिक्षणमंत्री तावडे यांच्याविरुध्द हक्कभंगाची सूचना मांडली. मात्र, सत्ताधारी सदस्याला सरकारविरोधात हक्कभंग दाखल करता येत नाही, असे सांगत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेच्या सूचनेला विरोध करत आणि नियमांवर बोट ठेवत सेनेच्या हक्कभंग सूचनेस हरकत घेतली.
‘अर्थ’पूर्ण मौन?
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एस.डी. कॉर्पोरेशनला मुख्यमंत्र्यांचे नाव वापरुन ५०० ते ७०० कोटींचा फायदा करुन दिल्याचा ठपका असताना त्यांचा राजीनामा मागण्याची संधी विरोधकांनी गमावली. विरोधकांच्या या मौनाचे अनेक ‘अर्थ’ काढले गेले. कदाचित, आपलाही भूजबळ होईल, म्हणून सगळे गप्प असतील, अशी मार्मिक प्रतिक्रिया विरोधीपक्षातील काही आमदारांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोडले तर महेता यांच्या राजीनाम्याची मागणी एकाही नेत्याने लावून धरलेली नाही.
शिवसेनाही गप्प
एरव्ही भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाºया शिवसेनेच्या आमदारांना मेहतांचा विषय सभागृहात काढू नका, अशा सूचना असल्याचे सेनेच्याच आमदारांनी खाजगीत सांगितले. आम्हाला बोलायचे होते, पण आदेश असल्याने आम्ही गप्प बसलो यावरुन काय समजायचे ते समजा, असे आमदारांचे म्हणणे होते.
शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. सत्ताधारी सदस्याला सरकारविरोधात हक्कभंग आणता येत नाही. सरकारमधून आधी बाहेर पडा आणि मगच हक्कभंग मांडा - नारायण राणे, काँग्रेस
सरकारमध्ये राहून त्यांच्यावरच टीका करणे बरे नाही. - सुनील तटकरे, राष्ट्रवादी