स्वत:चाच निषेध ऐकून विरोधकांचा सभात्याग!

By admin | Published: December 11, 2015 12:38 AM2015-12-11T00:38:41+5:302015-12-11T00:38:41+5:30

शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग करतो असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले,

Opponents are listening to their own protest! | स्वत:चाच निषेध ऐकून विरोधकांचा सभात्याग!

स्वत:चाच निषेध ऐकून विरोधकांचा सभात्याग!

Next

अतुल कुलकर्णी,  नागपूर
शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग करतो असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले, तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितल्यावर बहिष्कारासाठी बाहेर पडलेले विरोधक पुन्हा जागेवर बसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांचा निषेध केला, तो ऐकून घेऊन विरोधी पक्ष सभागृहाबाहेर पडला..!
कधीही न घडणारी अशी दुर्मिळ गोष्ट गुरुवारी विधानसभेत घडली. सलग तिसऱ्या दिवशी कर्जमाफीवरून विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव सरकारने विरोधकांच्याच साहाय्याने उलटवून टाकला. विधानपरिषदेत मात्र विरोधकांचे बहुमत असल्याने त्यांनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करून टाकले. या सगळ्या प्रकारावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना झोडपले.
काँग्रेसच्या मोर्चासाठी राष्ट्रवादीने मदत करत दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जाणार होते त्यामुळे आजचे कामकाज काँग्रेसने बंद पाडायचे असे दोन्ही पक्षाच्या एकत्रीत बैठकीत ठरले होते. मात्र गोंधळ घालून सभागृह बंद पाडण्याऐवजी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कामकाज पूर्ण करण्याची आयती संधी मिळाली.
विरोधकात एकवाक्यता नसल्याचे आणि एकमेकांना उघडे पाडण्याची एकही संधी वाया जाऊ द्यायची नाही असा जणू पणच करून सभागृहात आलेल्या काँग्रेसने आज राष्ट्रवादीला उघडे पाडण्याच्या नादात स्वत:ची नाच्चक्की करून घेतली. काँग्रेसने खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात मोर्चा काढून जे कमावले ते घालवण्याचे काम आज विरोधी पक्षनेत्यांनी केले. प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतरही काँग्रेसने सभागृहात गदारोळ सुरू केला. मात्र अध्यक्ष प्रश्नोत्तराचा तास स्थगित करत नाहीत हे लक्षात येताच गोंधळ वाढवण्याऐवजी कामकाजावर बहिष्कार टाकण्याला विरोधी पक्ष नेत्यांनी प्राधान्य दिले. त्यानंतर सूत्रे हलली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीतून फोनाफोनी केली, तेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपताच पुन्हा विरोधक सभागृहात आले. काही काळ गदारोळ झाला. दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. मात्र पुन्हा सभागृहात आलेल्या विरोधकांनी सरकार कर्जमाफी देत नाही, नुसती वाझोंटी चर्चा करते आहे असे सांगत सभात्याग करणे पसंत केले.
> विधानसभेत असेही काही पायंडे
२९३ अन्वये विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेले प्रस्ताव एकाच दिवशी एकाच कामकाज पत्रिकेत दाखविण्याची नवी प्रथा या अधिवेशनात सुरू झाली आहे. यापूर्वी १९ डिसेंबर २०१३ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषाच्या प्रश्नावर असेच दोन वेगवेगळे प्रस्ताव एकाच दिवशी एकाच कार्यक्रम पत्रिकेत आले होते. असे प्रस्ताव एकत्रपणे सभागृहात आणणे अपेक्षित असते. मात्र तसे घडले नाही. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना विचारले असता ते म्हणाले, मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा आणि गुरुवारी विरोधकांचा प्रस्ताव होता. मंगळवारचा प्रस्ताव पुढे ढकलला गेल्याने दोन्ही प्रस्ताव एकाच दिवशी आले. मात्र सभागृहात चर्चा करून हे दोन्ही प्रस्ताव क्लब केले जातील. याआधी असे घडले होते की नाही माहिती नाही असेही ते म्हणाले. शुक्रवारी अशासकीय कामकाज दाखवले जाते मात्र ते देखील गुरुवारी दाखवण्यात आले होते. याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आज आम्ही सभासदांशी चर्चा करून तशी तडजोड केली आहे! चर्चा नको निर्णय हवा म्हणणाऱ्यांना चर्चा हवी कशाला?
शेतकरी आत्महत्यांवर सरकार वांझोटी चर्चा करत आहे. आम्हाला चर्चा नको, निर्णय हवा आहे अशी मागणी करत गेली तीन दिवस विधानसभेचे कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधकांनीच २९३ अन्वये चर्चेचा प्रस्ताव दिला आहे हे विशेष. जर चर्चाच नको आहे, तर मग प्रस्ताव देता कशाला अशा शब्दात खिल्ली उडवत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना झोडपले. सगळे कामकाज बाजूला सारून सरकारची चर्चा करण्याची तयारी असताना काँग्रेसला त्यांच्या मोर्चासाठी सभागृह बंद पाडायचे होते, तर राष्ट्रवादीला त्यांच्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी. यांचे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम निव्वळ नौटंकी आहे. यांना त्यातून राजकारण करायचे आहे असेही खडसे लोकमतशी बोलताना म्हणाले. एरवी सरकार चर्चेला तयार नसल्याचे चित्र असते. येथे मात्र विरोधकच चर्चेला घाबरत आहेत. कारण त्यांना एकमेकांचे हिशोब मार्गी लावायचे आहेत असा सणसणीत टोलाही खडसे यांनी लगावला. विधानसभेत जमले, परिषदेत फसले
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून विधानसभा सलग तिसऱ्या दिवशी बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव विधानसभेत जरी यशस्वी झाला नाही तरी विधानपरिषदेत मात्र सरकारचा दवाब असतानाही उपसभापती वसंत डावखरे यांनी अखेर विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब करून टाकली. त्यासाठीही पडद्याआड बऱ्याच हालचाली घडल्या. तालिका अध्यक्ष म्हणून आम्ही आमचे सदस्य बसवून कामकाज चालवून नेऊ असे सांगण्यात आले मात्र विरोधकांच्या संख्याबळापुढे परिषदेत सत्ताधाऱ्यांचा टीकाव लागला नाही.

Web Title: Opponents are listening to their own protest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.