विधीवरील करवाढीला पुजाऱ्यांचा विरोध
By Admin | Published: July 8, 2017 03:36 AM2017-07-08T03:36:42+5:302017-07-08T03:36:42+5:30
तुळजाभवानी मंदिरातील विविध धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिर संस्थानला पूर्वीपासूनच कर द्यावा लागतो. त्यात मोठी वाढ करण्याचा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरातील विविध धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिर संस्थानला पूर्वीपासूनच कर द्यावा लागतो. त्यात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आल्याने पुजाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. लोकप्रतिनिधींच्या व्हीआयपी दर्शनाऐवजी तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांसाठीच सशुल्क दर्शन करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, भेट होऊ शकली नाही.
संस्थानच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अभिषेक कर १० रुपयांवरुन १०० रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला होता़ याशिवाय ‘सशुल्क’ दर्शन सुरू करण्याचाही प्रस्ताव या बैठकीत आणण्यात आला. याला आमदार मधुकरराव चव्हाण यांनी विरोध करुन सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका मांडली़ भवानीमातेच्या दर्शनासाठी येणारा जवळपास ८० टक्के भाविक गरीब घटकातील असतो़ त्यामुळे ही करवाढ अप्रत्यक्षपणे या गरीब भाविकांवरच लादली जाऊ शकते़