विदर्भात विरोधकांनी खाते उघडले; काँग्रेसला मिळाली एकमेव जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:32 AM2019-05-25T05:32:25+5:302019-05-25T05:32:31+5:30
२०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहा जागांवर कब्जा करणाऱ्या भाजप- सेना युतीला यंदा मोदी त्सुनामीचा हवा तसा लाभ मिळाला नाही.
- गजानन चोपडे
२०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहा जागांवर कब्जा करणाऱ्या भाजप- सेना युतीला यंदा मोदी त्सुनामीचा हवा तसा लाभ मिळाला नाही. चंद्रपूर आणि अमरावतीत दोन दिग्गज नेत्यांचा पराभव युतीच्या जिव्हारी लागला आहे. चुकलेल्या नियोजनामुळे दोन जागा गमावण्याची नामुष्की युतीवर ओढवली. केंद्रिय मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ या दोन दिग्गजांच्या पराभवामुळे युतीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला खरा; पण नागपूरकरांनी जातीच्या राजकारणाला न जुमानता विकासावर शिक्कामोर्तब करीत गडकरी यांना मताधिक्याने निवडून आणले. पटोले यांनी डीएमके (दलित, मुस्लीम, कुणबी) कार्ड खेळण्याचा केलेला प्रयत्न येथे चांगलाच फसला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या पुढाकाराने किशोर गजभिये यांना उमेदवारी मिळाली. परंतु काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचा दारूण पराभव झाला. येथेही जातीचे कार्ड चालविण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आणि सतत संपर्कात असणारे शिवसेनेचे कृपाल तुमाने दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले. भाजपच्या मजबूत संघटनेचा लाभ तुमाने यांना मिळाला.
भंडारा- गोंदिया मतदारसंघात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणणाºया मतदारांनी यंदा मात्र पुन्हा भाजपला संधी दिली. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि काँग्रेस पक्षाने इमानेइतबारे दिलेली साथही राष्टÑवादीच्या नाना पंचबुद्धे यांच्या कामी आली नाही. उलट भाजपने दिलेल्या तरूण चेहºयाला मतदारांनी पसंती देत ही जागा भाजपच्या खात्यात टाकली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके यांनी केलेल्या योग्य नियोजनाचा लाभ सुनील मेंढे यांना झाला आणि ते नगराध्य पदावरून थेट खासदार झाले.
गडचिरोलीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा विजय निश्चित मानला जात असताना भाजपने मात्र ७७ हजार मतांची आघाडी घेत बाजी मारली. खासदारकीची माळ पुन्हा अशोक नेते यांच्या गळ्यात पडली. वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. मागील पाच वर्षातील सततचा जनसंपर्क आणि विकास कामांकडे दिलेले लक्ष त्यांच्या कामी आले.
महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांना पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांतर्गत गटबाजी आणि बाहेरचा उमेदवार हे काँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण येथे मानले जात आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत पोहोचल्या आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे रिंगणात असल्याने युतीला त्याचा फटका बसण्याची भीती होती मात्र मतदारांनी गवळी यांच्याच गळ्यात विजयाची माळ टाकली. अकोला मतदारसंघातून सतत चवथ्यांदा लोकसभेत पोहचलेले संजय धोत्रे यांनी आपल्या विरोधात जनमानसात विरोधी वातावरण तयार होणार नाही, याची काळजी घेतली. नेमकी हीच त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. बुलडाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनीदेखील विजयाची हॅटट्रीक केली. बुलडाणा मतदारसंघातून तिसºयांदा विजयी होणारे ते दुसरे खासदार ठरले आहे.
चंद्रपूर, अमरावतीत बदल
चंद्रपूर मतदारसंघाचा निकाल युतीला धक्का देणारा ठरला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सलग विजय संपादन करणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी पराभव केला. सर्वत्र मोदी लाट असताना चंद्रपूरकरांनी मात्र यंदा नव्या चेहºयाला संधी दिली. विशेष म्हणजे धानोरकर हे महाराष्टÑातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार आहेत. हाच बदल अमरावती मतदार संघातही दिसून आला. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी यंदा मात्र शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करीत संसदेत शानदार एन्ट्री केली आहे.