विरोधकांनी बंडखोरांसंदर्भातील मुख्यमंत्र्यांची 'ती' क्लिप पाहावी ; सोपलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:53 PM2019-10-16T17:53:05+5:302019-10-16T18:32:35+5:30
अनेक वर्षे मी शरद पवार यांच्यासोबत काम केले. एक दोन वेळा अन्यायही झाला. याची खंतही व्यक्त केली. पण शेवटी काहीही केलं तरी मी माणूस आहे. मनात कुठ तरी त्याची बोचणी असते. त्यामुळे पहिलं प्रेम ते पहिलच प्रेम असते, अस सांगत त्यांनी शिवसेना प्रवेशाचं समर्थन केले.
- राजा माने
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेते सामील होऊन महायुतीचे उमेदवार असलेले दिलीप सोपल यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. अमूक नेत्याची आपल्याला साथ असल्याचा दावा करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची बंडखोरांसदर्भातील क्लिप पाहावी, असा टोला सोपल यांनी लगावला. 'मी लोकमत' या कार्यक्रमात सोपल बोलत होते.
मी कोणतीही निवडणूक सोपी समजत. कोणालाही निवडणूक सोपी नसतेच. चुरस असते आणि लोकांना आपले मुद्दे पटले तरच ते तुम्हाला मतदान करतात. त्यामुळे निवडणुकीत आपण गाफील नाही. तसेच मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळे आपल्यासमोर मोठे अडथळे नाहीच असं सोपल यांनी सांगितले. तसेच जे लोक सांगण्याचा प्रयत्न करतात की मुख्यमंत्र्यांची, भाजप प्रदेशाध्यक्षांची आपल्याला साथ आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे बंडखोरांसंदर्भातील भाषण पाहिले नाही, ते त्यांनी पाहावे असा सल्ला सोपल यांनी राऊत यांना दिला.
विकासाच्या मुद्दावर तुम्ही मतदारांना काय सांगाल यावर सोपल म्हणाले, मी दोनवेळा नव्याने झालेल्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दोन्ही कार्यकाळात सर्वसामान्यांपर्यंत सरकारी मदत जास्तीत जास्त पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मी दरवेळी माझ्या कामाचा लेखोजोखा जनतेसमोर मांडत असतो. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी, तालुक्यात शांततामय वातावरण राहण्यासाठी आणि दुष्काळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सोपल यांनी सांगितले.
अनेक वर्षे मी शरद पवार यांच्यासोबत काम केले. एक दोन वेळा अन्यायही झाला. याची खंतही व्यक्त केली. पण शेवटी काहीही केलं तरी मी माणूस आहे. मनात कुठ तरी त्याची बोचणी असते. त्यामुळे पहिलं प्रेम ते पहिलच प्रेम असते, अस सांगत त्यांनी शिवसेना प्रवेशाचं समर्थन केले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच प्रेम तुम्हाला मिळणार का यावर सोपल म्हणाले की, फडणवीससाहेब माझ्या समोर विधानसभेत आले. मी राज्यमंत्री असताना त्यांचे आणि माझ्या अनेकदा संबंध यायचे. विषयाची मांडणी करण्यात ते उत्कृष्ट मानले जातात. त्यांच्याशी आपले चांगले वैयक्तीत संबंध असल्याचे सोपल यांनी सांगितले.