विरोधकांचा सन्मान ठेवायचा असतो, खेचायचे नसते- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 01:51 AM2019-08-04T01:51:03+5:302019-08-04T06:43:13+5:30
चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर
कोल्हापूर : तुम्ही सत्तेत असलात तरी विरोधकांशी सौहार्दानेच वागले पाहिजे, त्यांचा द्वेष करू नये, असे बंधन लोकशाहीनेच घातले आहे. विरोधक कायमचे शत्रू नसतात. त्यांचा मान ठेवायचा असतो, त्यांना सारखे-सारखे आपल्याकडे खेचायचेही नसते, असा चिमटा काढत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच त्यांना लोकशाहीच्या धड्याची आठवण करून दिली.
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालय उद्घाटन समारंभानिमित्त शनिवारी चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर आले. हा योग साधून साहजिकच दोघांमध्ये शाब्दिक कोट्या रंगल्या. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले, मी काही त्यांना पक्षवाढीच्या शुभेच्छा देणार नाही. त्यांनी राज्यात २३२ वरून २५० आमदार निवडून आणणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ते जरूर आणावेत, माझ्या त्यांना वैयक्तिक शुभेच्छा आहेत; पण हे करताना त्यांनी लोकशाही प्रगल्भ आहे, हे विसरू नये. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी लोकशाही खऱ्या अर्थाने आता प्रगल्भ झाली आहे. मोजक्या राजकीय घराण्यांकडून आता सर्वसामान्यांच्या हातांत सत्तेची केंद्रे जात आहेत.
बंद खोलीत चर्चा
उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात तेथेच एका खोलीत चर्चा झाली. अल्पोपाहाराच्या निमित्ताने १० मिनिटे बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.