विरोधकांवर होते सूडबुद्धीने कारवाई
By admin | Published: February 10, 2016 01:10 AM2016-02-10T01:10:13+5:302016-02-10T01:10:13+5:30
भाजपाला देशभरातील विविध निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करावा लागत असल्यानेच, नैराश्यापोटी विरोधी पक्षातील नेत्यांवर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका विधानसभेतील
मुंबइ: भाजपाला देशभरातील विविध निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करावा लागत असल्यानेच, नैराश्यापोटी विरोधी पक्षातील नेत्यांवर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
सरकारने नुकतीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी सीबीआयला दिली आहे. ही कारवाई राजकीय सूड उगविण्यासाठी असून, काँग्रेस पक्ष खा. चव्हाण यांच्या पाठिशी आहे, असा ठराव आज टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत पारित करण्यात आला.
विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई सरकारच्या कारस्थानाचा भाग असल्याचे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विधानातून स्पष्ट होते. राज्यपाल काय निर्णय घेणार, सीबीआय कोणाला अटक करणार, ईडी काय कारवाई करणार, लाचलुचपत प्रतिबंधक खाते कुठे छापे टाकणार, याबाबत सोमय्या आधी माध्यमांसमोर विधाने करतात. त्यानंतर यंत्रणांकडून कारवाई होते, असा दावा विखे पाटील यांनी केला.
खा. चव्हाण यांच्याविरोधात कारवाईची परवानगी दिल्याबद्दल आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांचा काँग्रेस तीव्र विरोध करणार आहे, तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातील कारवाईदेखील राजकीय सूडबुद्धीचा प्रकार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.